Srikshetra Madhi Yatra : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी यात्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. मढी ग्रामपंचायतीकडून मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोधाची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं दिसत आहेत.
हेही वाचा – थांबलेल्या ट्रकला धडकून दुचाकीस्वारचा अपघात, अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी
भटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेली श्रीक्षेत्र मढी यात्रा राज्यातील एक प्रमुख धार्मिक यात्रा मानली जाते. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी यात्रेचा मुख्य सोहळा पार पडतो. राज्यासह देशभरातून हजारो भाविक या यात्रेसाठी मढीत दाखल होत असतात. मात्र, मागील वर्षी मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजातील व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास विरोध दर्शवणारा ठराव घेतला होता. या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. अद्याप अंतिम निर्णय झालेला नसतानाही यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करू देणार नसल्याची भूमिका माजी सरपंच तथा प्रशासक संजय मरकड यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे.
ठराव रद्द करण्यासाठी पुन्हा ग्रामसभा
गेल्यावर्षी मुस्लिम व्यापाऱ्यांना विरोध करणारा ठराव 327 मतांनी हा संमत झाला होता. हा ठराव रद्द करण्यासाठी पुन्हा ग्रामसभा घेऊन नवा ठराव करणे गरजेच आहे. त्यातच ग्रामपंचायतची मुदत संपल्याने पुन्हा ग्रामसभा होऊन नवा ठराव होणे शक्य नाही. त्यामुळे यात्रेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनही सतर्क झाले आहे.
नव्या अध्यक्षांकडून मुस्लिमांना यात्रेत व्यवसाय करण्यास परवानगी
मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपलेली असून सध्या प्रशासक कार्यरत असल्यामुळे संजय मरकड यांना असा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच देवस्थान समितीच्या नव्या अध्यक्षांकडून मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा मुस्लिम बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.







