Sanju Samson’s innings : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील अत्यंत महत्त्वाचा सामना काल कोलकत्त्याच्या इडन गार्डन्स मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय फलंदाज संजू सॅमसन याने ऐहिहासिक खेळी करत वेस्ट इंडिज टील अक्षरष: लोळवली. या विजयामुळे भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये दमदार एन्ट्री झाली. मागील काही सामन्यात सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळत नव्हत, त्यानं अनेक वर्ल्डकप डगआऊटमध्ये उभा राहून डोळ्याने बघितले. पण म्हणतात ना अपना टाईम आयेगा, असेचं काहीच संजू सॅमसनच्या बाबतित झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचा तो टाईम आला, अन् भाऊनं वेस्ट इंडिजचा करेक्ट कार्यक्रम केला. कारण संजू जेव्हा धावा कुटायला लागला. तेव्हा वेस्ट इंडिजची बलाढ्य टीम रडकुंडीला आली.
अभिषेक शर्मा आणि इशान किशन स्वस्तात बाद
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अत्यंत महत्त्वाच्या आणि अटीतटीच्या ‘करो या मरो’ सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ५ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. ज्याने नाबाद ९७ धावांची खेळी करत भारताला थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. वेस्ट इंडिजने दिलेल्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अडखळती झाली होती. अवघ्या ४.२ ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा आणि इशान किशन स्वस्तात बाद झाल्यामुळे भारतीय संघ दडपणाखाली होता. मात्र, संजू सॅमसनने मैदानात पाय रोऊन खेळाचे चित्र बदलले. त्याने अवघ्या ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ९७ धावा ठोकल्या.
विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला
टी-२० वर्ल्ड कपमध्ये धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजाकडून करण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे. त्याने विराट कोहलीचा नाबाद ८२ धावांचा विक्रम मोडीत काढला. सॅमसनने आपले अर्धशतक अवघ्या २६ चेंडूत पूर्ण केले होते. सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला होता. भारताला विजयासाठी शेवटच्या 6 बॉलमध्ये ७ धावांची गरज होती. गोलंदाजीसाठी रोमारिओ शेफर्ड सज्ज होता. मात्र, संजूने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून धावसंख्या बरोबरीत आणली आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विजय मिळवल्यानंतर संजू मैदानात भावूक झालेला पाहायला मिळाला, सोशल मीडियावर फक्त संजूचीच चर्चा आहे.
वेस्ट इंडिजकडून १९५ धावांचे आव्हानात्मक टार्गेट
टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. त्यांच्याकडून रोस्टन चेसने सर्वाधिक ४० धावा केल्या, तर जेसन होल्डरने नाबाद ३७ धावांची आक्रमक खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले, भारताच्या फिल्डिंगचा दर्जा मात्र बराच सुमार राहिला. आता भारताचा उपांत्य फेरीतील सामना ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बलाढ्य इंग्लंड संघाविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे दोन वेळचा जगज्जेता वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
मी या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो
सामन्यानंतर सॅमसन म्हणाला, मी या दिवसाची खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. माझ्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले, पण आज देशासाठी मॅच जिंकून देण्याचं माझं हे स्वप्न पूर्ण झालं आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही संजूच्या खेळीचे कौतुक करताना त्याला वर्ल्ड क्लास असं म्हटलंय. आता सेमिफायनलमध्ये भिडताना कोण आणखी नवा धुरंधर ठरणार की ओव्हरऑल टीम एफर्ट बघायला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.












