Devendra Fadnavis Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा पार पडली. दर्शनानंतर त्यांनी विठुरायाच्या चरणी राज्य, शेतकरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यासाठी प्रार्थना केली. यावेळी पंढरपूर कॉरिडोअर प्रकल्पाबाबतही त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपू येथे विठ्ठल- रुक्मिणीची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महत्वाच्या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत देशाच्या तरुणांसाठी सुरू असलेल्या विकासाच्या वाटचालीसाठी विठ्ठलाचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.
दर्शनानंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले (Devendra Fadnavis Pandharpur)
मुख्यमंत्री म्हणाले की, भारतातील युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. देशाच्या प्रगतीचा हा प्रवास अधिक यशस्वी व्हावा आणि युवकांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी त्यांनी विठुरायाच्या चरणी प्रार्थना अर्पण केली.
पुढे म्हणाले…
विठ्ठल हा सामान्य जनतेच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असल्याचे सांगताना त्यांनी म्हटले की, संकटांचा सामना करण्याची प्रेरणा लाखो भाविकांना विठुरायाकडून मिळते. शासनासाठी वेगळे काही मागण्याची गरज नसते, कारण भक्तांच्या भावना आणि गरजा देवाला आपोआप समजतात.
विठ्ठलाला सांगड घातले… (Devendra Fadnavis Pandharpur)
आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) काळ हा खरीप हंगामासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद करत त्यांनी राज्यात भरपूर पाऊस पडावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्या जीवनात आनंद व समृद्धी यावी, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.
दिल्लीत जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. काही आंदोलने खऱ्या प्रश्नांवर आधारित असतात, तर काही ठिकाणी राजकीय हेतूही दिसून येतात. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे; मात्र हिंसाचार किंवा अराजकता निर्माण करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या काही मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यामुळे संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविणे अधिक योग्य ठरते, असे त्यांनी मत व्यक्त केले.
पंढरपूर कॉरिडोअर प्रकल्पाबाबत
पंढरपूर कॉरिडोअर प्रकल्पाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या वर्षातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागू शकतो. नागरिकांच्या बहुतांश शंका दूर झाल्या असून उर्वरित प्रश्नांवरही चर्चा करून मार्ग काढला जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरचे स्वरूप अधिक आकर्षक आणि आधुनिक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हमीभावाने धान्य खरेदीची प्रक्रिया
शेतकरी धोरणांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हमीभावाने धान्य खरेदीची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हे आव्हान कमी करण्यासाठी राज्य सरकारने मोफत वीज, ठिबक सिंचन, सौरपंप, पाणीपुरवठा सुविधा तसेच कृषी यंत्रसामग्रीवरील अनुदान अशा विविध योजना सुरू केल्या आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देऊन उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच महाविस्तार एआयच्या मदतीने शेती अधिक कार्यक्षम बनवून उत्पादन खर्च सुमारे २५ टक्क्यांनी घटवणे आणि उत्पादनात वाढ करणे, हा सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









