Vasant More | माजी नगरसेवक आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) हे अडचणीत सापडले आहेत. कारण वसतं मोरे यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ तुकाराम लहाडे यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोरेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी मोरेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वसंत मोरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
वसंत मोरे यांनी 25 फेब्रुवारीला पुणे महानगरपालिकेत पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत मोरेंनी तक्रारदार विश्वनाथ लहाडेंचा उल्लेख करत काही वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपण अनुसूचित जातीचे आहोत, हे माहिती असताना देखील मोरेंनी जाणूनबूजून आणि हेतूपू्र्वक अपमानास्पद वक्तव्य केलं असल्याचा आरोप फिर्यादी लहाडेंनी केला आहे.
फिर्यादी लहाडेंनी दिलेल्या तक्रारीनुसार, लहाडे खूप दारू पिला होता, तो इतका दारू पिलेला की त्याला बोलताही येत नव्हतं. तसंच तो ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत आहे, असं वक्तव्य वसंत मोरेंनी केलं होतं. नंतर हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असल्याचा आरोप लहाडेंनी केला आहे.
मोरेंनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे आपली बदनामी झाली आहे आणि याचा कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे, असंही फिर्यादी लहाडेंनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तसंच कुटुंबीय सध्या तणावात असून घरी भीतीचं वातावरण निर्माण झालं असल्याचंही लहाडेंनी म्हटलं आहे. लहाडेंनी केलेल्या या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी वसंत मोरेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. सध्या पोलीस पत्रकार परिषदेतील व्हायरल व्हिडीओ फुटेजची पडताळणी करत आहेत.
वसंत मोरेंनी केलेल्या या व्हायरल वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना हे वक्तव्य करणं चांगलंच महागात पडल्याचं दिसत आहे. तर मोरेंवर केलेल्या या आरोपांनंतर ते नेमकी काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, वसंत मोरे हे त्यांच्या रोखठोक आणि आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. तसंच ते त्यांच्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.












