Pune Metro Line 3: पुणेकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. आता शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाईन ३ च्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाली असून, येत्या ३ नोव्हेंबरला उद्घाटन तर ४ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे. चला तर जाणून घेऊयात या मेट्रोची स्थानके, वेळा आणि खास वैशिष्ट्ये
Pune Hinjawadi Metro News: पुणेकरांसाठी आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची (Pune Metro News) बातमी आहे. अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली शिवाजीनगर ते मान- हिंजवडी मेट्रो लाईन ३ (Shivajinagar Hinjawadi Metro) अखेर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे ऑनलाईन (Pune Metro Opening) उद्घाटन होणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी ४ नोव्हेंबरपासून सर्वसामान्य प्रवाशांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ पैकी १७ स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत.
बालेवाडी क्रीडा संकुलात रंगणार उद्घाटन सोहळा
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी 31 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत मेट्रो सुरू करण्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली. त्यानुसार 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील अन्य प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर 4 नोव्हेंबरपासून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता धावणार असून रात्री 11.40 वाजेपर्यंत सेवा उपलब्ध असेल.
पहिल्या टप्प्यात किती स्थानके सुरू
शिवाजीनगर ते मान-हिंजवडी हा मेट्रो (Metro Line 3) मार्ग सुमारे 23.2 किलोमीटर लांबीचा असून त्यावर एकूण 23 स्थानके आहेत. यामुळे हिंजवडी आयटी पार्क, बाणेर, बालेवाडी आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागातील प्रवाशांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, पहिल्या टप्प्यात सर्व स्थानके सुरू होणार नाहीत. सुरुवातीला 17 स्थानकांवर प्रवाशांना मेट्रोची सुविधा मिळणार आहे. उर्वरित सहा स्थानकांना आवश्यक परवानग्या आणि कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहे.
प्रारंभी बंद राहणाऱ्या सहा स्थानकांमध्ये लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर-पाषाण लिंक रोड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि शिवाजीनगर या स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना सुरू असलेल्या स्थानकांची माहिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणेरी मेट्रोची धुरा महिलांच्या हाती!
या मेट्रो मार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण ट्रेन ऑपरेशनची जबाबदारी महिलांकडे असणार आहे. या मार्गावरील सर्व मेट्रो ट्रेन महिला ट्रेन ऑपरेटर्स चालवणार आहेत.
यासाठी जवळपास 100 महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. दिवसा आणि रात्री ट्रेन चालवण्याचे प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष चाचणीदरम्यानचा अनुभव या महिलांनी घेतला आहे. त्यामुळे पुणे मेट्रो लाईन-3 महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.
सौरऊर्जेवर चालणार मेट्रोची मोठी यंत्रणा
पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दृष्टीनेही या मेट्रो मार्गाची रचना करण्यात आली आहे. मेट्रो स्थानके आणि डेपो परिसरात सौरऊर्जा निर्मितीची व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रकल्पातून सुमारे 7.6 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असून मेट्रोच्या एकूण विजेच्या गरजेपैकी जवळपास 30 टक्के वीज सौरऊर्जेतून उपलब्ध होणार आहे.
याशिवाय या मेट्रोमध्ये तिसऱ्या रेल्वे रुळाद्वारे वीजपुरवठा करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे पारंपरिक मेट्रोप्रमाणे वरून जाणाऱ्या विजेच्या तारांची आवश्यकता राहणार नाही.
तिकीट काढणे होणार सोपे
प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मोबाईल ॲप, व्हॉट्सॲप QR तिकीट, स्थानकांवरील तिकीट काउंटर आणि व्हेंडिंग मशीनच्या माध्यमातून तिकीट मिळवता येणार आहे.
याशिवाय नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचाही पर्याय उपलब्ध असेल. सध्या सुरू असलेल्या महामेट्रोच्या पुणे ॲपमधूनही लाईन-3 साठी तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरुवातीला दोन्ही मेट्रो सेवांसाठी स्वतंत्र बुकिंग पर्याय असतील. पुढे दोन्ही मार्गांमधील प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे.
आयटी कर्मचाऱ्यांना ट्रॅफिकमधून मिळणार दिलासा?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज हजारो कर्मचारी कामासाठी ये-जा करतात. सकाळी आणि संध्याकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अनेक कर्मचाऱ्यांचा बराच वेळ प्रवासात जातो.
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो सुरू झाल्यानंतर आयटी पार्क आणि शहरातील महत्त्वाच्या भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत होईल. विशेषतः खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो.
मात्र, मेट्रो स्थानकांपासून कार्यालये आणि निवासी भागांपर्यंत पोहोचण्यासाठी फीडर बस आणि इतर शेवटच्या टप्प्यातील वाहतूक सुविधा प्रभावी असणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
एकंदरीत, पुणे मेट्रो लाईन-3 सुरू झाल्यानंतर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भर पडणार आहे. आता पुणेकरांचे लक्ष 3 नोव्हेंबरच्या उद्घाटन सोहळ्याकडे आणि 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रत्यक्ष प्रवासी सेवेकडे लागले आहे.
पहिल्या टप्प्यात सुरू होणारी 17 स्थानके
मान (मेगापोलिस सर्कल)
मान – MIDC सर्कल, फेज 2
मान बस डेपो
हिंजवडी फेज 2 – सर्कल 2
हिंजवडी फेज 2 – सर्कल 1
पद्मभूषण चौक
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी
हिंजवडी फेज 1
वाकड चौक
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे
मिटकॉन बालेवाडी
आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी
औंध
सकाळनगर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
कृषी महाविद्यालय
जिल्हा न्यायालय (डिस्ट्रिक्ट कोर्ट)
सुरुवातीला बंद राहणारी 6 स्थानके
लक्ष्मी नगर
बालेवाडी फाटा
बाणेर गाव
बाणेर-पाषाण लिंक रोड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
शिवाजीनगर







