Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • हिंजवडीकरांना मोठा दिलासा! मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी २१ रस्त्यांचे जाळे; पाहा ४२६ कोटींचा मास्टर प्लॅन
Pune

हिंजवडीकरांना मोठा दिलासा! मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी २१ रस्त्यांचे जाळे; पाहा ४२६ कोटींचा मास्टर प्लॅन

Hinjewadi Metro Connectivity
30
Hinjewadi Metro Connectivity: पुण्यातील हिंजवडी परिसराची आयटी हब म्हणून ओळख आहे. नुकतीच येथे मेट्रो सेवा सुरू झाली आहे. तसेच, परिसरातील वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले आहे.

Hinjewadi Metro Connectivity: हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील ( Rajiv Gandhi IT Park )  वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आता रस्ते आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीवर भर दिला जाणार आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत ( Hinjewadi Metro ) प्रवाशांना सहज आणि जलद पोहोचता यावे, यासाठी अंतर्गत रस्त्यांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून मेट्रो मार्गावरील स्थानकांना जोडणारे (Hinjewadi Road Development) तब्बल २१ रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे. या रस्त्यांची एकूण लांबी सुमारे २० किलोमीटर असून, काही विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा केली जाणार आहे. त्याचबरोबर आवश्यक ठिकाणी नवीन रस्तेही तयार केले जाणार आहेत.

हेही वाचा: शिव योगाचा प्रभाव! ‘या’ राशींची कामे आज मार्गी लागणार? जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

आठ मेट्रो स्थानकांसाठी स्वतंत्र नियोजन

हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गातील हिंजवडी परिसरात सुमारे १० किलोमीटरचा मुख्य रस्ता आहे. हा भाग एमआयडीसी आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येतो. या मार्गावर आठ स्थानके असून, प्रत्येक स्थानकाभोवती साधारण ५०० मीटर ते १.५ किलोमीटरच्या परिसरात रस्त्यांचे जाळे उभारले जाणार आहे.

मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर स्थानकांवर पोहोचण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची गरज कमी व्हावी आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ अधिक सक्षम व्हावी, हा या नियोजनामागील मुख्य उद्देश आहे.

या प्रकल्पासाठी ४२६ कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली असून, संबंधित रस्त्यांच्या कामांना वेग देण्याची तयारी सुरू आहे.

कोणत्या मेट्रो स्थानकाला किती रस्त्यांची जोडणी?

१. मेगापोलीस सर्कल स्थानक

आयटी पार्कच्या तिसऱ्या टप्प्यातील रस्ते, क्रिकेट मैदानाकडे जाणारा मार्ग, भोईरवाडी रस्ता तसेच टप्प्यातील अंतर्गत मार्गांचा विकास केला जाणार आहे. या सर्व रस्त्यांची एकत्रित लांबी सुमारे ४ किलोमीटर आहे.

२. क्वाड्रन सर्कल स्थानक

टप्पा क्रमांक तीनमधील दोन प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. या मार्गांची एकूण लांबी सुमारे ३.६ किलोमीटर आहे.

३. डोहरल स्थानक

या स्थानकासाठी हाय माऊंट रस्त्याचा विकास करण्यात येणार असून, त्याची लांबी सुमारे १.५ किलोमीटर आहे.

४. इन्फोसिस टप्पा दोन स्थानक

या स्थानकाला जोडण्यासाठी एमर्सन इनोव्हेटिव्हा रस्ता विकसित केला जाणार आहे. हा मार्ग सुमारे ५०० मीटर लांबीचा आहे.

५. विप्रो स्थानक

विप्रो स्थानकासाठी पार्क डिस्ट्रिक्ट रस्त्याची जोडणी केली जाणार असून, या मार्गाची लांबी सुमारे १.१ किलोमीटर आहे.

६. पॅल इंडिया स्थानक

विबग्योर शाळा रस्ता, लक्ष्मी चौक रस्ता आणि हिंजवडी-कासारसाई रस्ता या मार्गांवर काम केले जाणार आहे. या रस्त्यांची एकत्रित लांबी सुमारे १.५ किलोमीटर आहे.

७. शिवाजी चौक स्थानक

टप्पा क्रमांक एकमधील रस्ता, राजीव गांधी रस्ता, आयटूआयटी महाविद्यालय रस्ता, मारुंजे रस्ता आणि डांगे चौक रस्ता या मार्गांचा आराखड्यात समावेश आहे. या सर्व रस्त्यांची एकूण लांबी सुमारे ४.८ किलोमीटर आहे.

८. हिंजवडी स्थानक

नवीन वाकड-हिंजवडी लिंक रस्ता, सध्या सुरू असलेला बांधकामाधीन मार्ग आणि हिराई सीताई रस्ता या मार्गांवर भर दिला जाणार आहे. या रस्त्यांची एकत्रित लांबी सुमारे १.८ किलोमीटर आहे.

वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा

हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी आणि नागरिकांची ये-जा असते. त्यामुळे मुख्य मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अंतर्गत रस्त्यांचे जाळे महत्त्वाचे ठरणार आहे. मेट्रो स्थानकांना या रस्त्यांची थेट जोडणी मिळाल्यास प्रवाशांना स्थानकांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होऊ शकते.

मेट्रो आणि रस्ते वाहतूक यांच्यात समन्वय साधून ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ मजबूत करण्याच्या दृष्टीने हा आराखडा महत्त्वाचा मानला जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts