Hinjewadi IT Park : ज्या भागात दररोज कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होतात… जिथून सरकारला दरवर्षी अब्जावधी रुपयांचा महसूल मिळतो… ज्या शहराच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावते… तेच देशातलं अग्रगण्य आयटी हब असलेलं हिंजवडी आयटी पार्क आज नरकयातना का भोगतंय….
कधी काळी गाव असलेली हिंजवडी आज देशातील मोठे IT Hub ( Hinjewadi IT Park )
काल हिंजवडीमध्ये एका अभूतपूर्व आंदोलनाचा भडका उडाला. हजारोंच्या संख्येने आयटी व्यावसायिक, स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. प्रश्न एकच होता, हिंजवडी परिसरात पायाभूत सुविधांची कमी.. कालच्या या जनआक्रोशाने प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. काय होतं हिंजवडी शहर आणि काय झालंय… कोट्यावधींचा व्यवहार करणारं आयटी हब का दुर्लक्षित राहिलंय पाहूयात यावरच हा आमचा स्पेशल report….
जास्त मागे जाण्याची गरज नाही. अवघ्या २५ वर्षांपूर्वी, म्हणजेच २००० सालाच्या आधी हिंजवडी हे पुण्याच्या वेशीवरचं एक साधं, शांत आणि दुर्गम खेडेगाव होतं. चहूबाजूला टेकड्या, पाण्याचे ओढे आणि फक्त भातशेती…. संध्याकाळी ७ वाजले की या भागात सामसूम व्हायची. इथल्या जमिनीला कवडीमोल भाव होता. पण १९९८ मध्ये एका निर्णयाने या मातीचे नशीब बदललं.
महाराष्ट्र सरकारने नवीन आयटी धोरण आणले. MIDC ने जमिनी अधिग्रहित केल्या आणि जन्माला आला राजीव गांधी इन्फोटेक पार्क. इन्फोसिस आणि विप्रो यांच्यासारख्या दिग्गज कंपन्यांनी आपले पाय रोवले. पाहता पाहता देशातील आणि जगातील ८०० हून अधिक कंपन्या याठिकाणी आल्या. ३ टप्प्यांत पसरलेलं २८०० एकरचं हे साम्राज्य आज तब्बल ५ लाख तरुणांना रोजगार देतंय. साधं खेडं काही दिवसांत जागतिक नकाशावर टेक सिटी म्हणून चमकू लागलं.
हजारो कोटींचा व्यवसाय, पण मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम ( Hinjewadi Traffic )
पण आज या लखलखत्या इमारतींच्या मागचं वास्तव अतिशय विदारक आहे. हिंजवडी आयटी पार्क दरवर्षी सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसूल देतं. प्रोफेशन टॅक्स, रोड टॅक्स, जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स… करांचा डोंगर उभा करणाऱ्या या आयटी पार्कला बदल्यात काय मिळालं?
ट्रॅफिकचा विळखा, खड्ड्यांचे साम्राज्य.पाण्याचे टँकर…..
१ मधून फेस ३ कडे जाताना फक्त ५ किलोमीटरच्या अंतरासाठी आयटी कर्मचाऱ्यांना २ ते ३ तास ट्रॅफिकमध्ये सडत राहावं लागतं,रस्ते आहेत की खड्डे, हेच समजत नाही. दररोज दुचाकीवरून जाणारे टेक व्यावसायिक इथे अपघाताचे बळी ठरत आहेत,कोट्यवधींचे पॅकेज घेणारे इथले इंजिनिअर्स आज सोसायट्यांमध्ये राहताना थेंब थेंब पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. पाण्यासाठी दरमहा लाखो रुपये सोसायट्यांना मोजावे लागतात.
हेही वाचा : २५ लाख वर्षाला कमावत असाल तरच लग्न? मुलींच्या अपेक्षेने सर्वांनाच धक्का!
रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीने IT कर्मचाऱ्यांचे हाल ( Hinjewadi IT Park )
आता सर्वात मोठा प्रश्न पडतो की, एवढा पैसा येऊनही हिंजवडी दुर्लक्षित का आहे? याचं सर्वात मोठं कारण आहे,Multiple Authorities. हिंजवडीला विकासाचे अनेक बाप मिळाले, पण जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही….
हा परिसर MIDC च्या अंतर्गत येतो, पण नागरी सुविधांची जबाबदारी PMRDA कडे जाते. कचरा आणि स्थानिक प्रश्न ग्रामपंचायतीकडे उरतात. तर बाजूलाच पुणे PMC आणि पिंपरी-चिंचवड PCMC महानगरपालिका आहेत. जेव्हा रस्ता खराब होतो, तेव्हा एमआयडीसी म्हणते आमचा नाही, पीएमआरडीए म्हणते महापालिकेकडे जा! या सरकारी फुटबॉलमध्ये सामान्य करदात्या कर्मचाऱ्याचा आणि रहिवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे काम वर्षानुवर्षे संथ गतीने सुरू आहे. या कामामुळे रस्ते आणखी अरुंद झाले, पण Alternative Roads तयार करण्याचे साधे नियोजनही प्रशासनाला करता आले नाही. यामुळेच कंपन्या आता हिंजवडी सोडून दुसऱ्या राज्यांत जाण्याचा इशारा देत आहेत.
हिंजवडीत हजारोंचा आंदोलनातून प्रशासनाला इशारा
कालचा मोर्चा हा केवळ एक इशारा आहे. हजारो आयटी व्यावसायिक, स्थानिक शेतकरी आणि महिला एकत्र येऊन प्रशासनाची झोप उडवली आहे. जर वेळेत रस्ते सुधारले नाहीत, पाणी प्रश्न सुटला नाही, तर थेट काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या टेक सॅव्ही तरुणांनी दिला आहे.
Hinjewadi Traffic : हिंजवडी ही केवळ एक जागा नाही, ती महाराष्ट्राच्या प्रगतीचे इंजिन आहे. जर हे इंजिनच रुळावरून घसरलं, तर महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान होईल. सरकारने आता ४२६ कोटींचा निधी मंजूर केला आहे, पण तो कागदावरून जमिनीवर कधी उतरणार? हिंजवडीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी तात्पुरत्या मलमपट्टीची नाही, तर संपूर्ण परिसरासाठी Single Unified Authority निर्माण करण्याची गरज आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा हिंजवडीचे हे वैभव इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही.




