Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • वाशिममध्ये जिल्हा परिषद शाळेत संतापजनक प्रकार; विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा आरोप, शिक्षकाला पॉक्सोअंतर्गत अटक
गुन्हा

वाशिममध्ये जिल्हा परिषद शाळेत संतापजनक प्रकार; विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा आरोप, शिक्षकाला पॉक्सोअंतर्गत अटक

Washim School Sexual Case
58

-सचिन राणे | वाशिम प्रतिनिधी 

Washim School Sexual Case : वाशिम तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही विद्यार्थिनींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाळेत पोहोचून संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी विद्यार्थिनींची इन-कॅमेरा विचारपूस केली असता, शिक्षकाकडून अयोग्य स्पर्श आणि लैंगिक स्वरूपाचा त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शिक्षक दिलीप बोरकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 75(2) तसेच पॉक्सो ( POCSO ) कायदा 2012 मधील कलम 8, 10 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला रात्री अटक केली आहे. पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक विद्यार्थिनींना अभ्यास सांगण्याच्या कारणाने बोलवत होता. त्यानंतर त्यांच्यासोबत अयोग्य वर्तन आणि चुकीचा स्पर्श करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत एका विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी घरी आईला माहिती दिली होती. मात्र, त्यावेळी तिच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अभ्यासाच्या कारणाने विद्यार्थिनींना बोलावल्याचा आरोप ( Washim School Sexual Case )

9 सप्टेंबर रोजी विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास शाळेतील एका शिक्षिकेने तिच्या आईला फोन करून तातडीने शाळेत बोलावून घेतले. संबंधित विद्यार्थिनी रडत शिक्षिकेकडे आली होती. कारण विचारल्यानंतर तिने शिक्षकाच्या कथित गैरवर्तनाची माहिती शिक्षिकेला दिल्याचे सांगण्यात आले. यानंतर विद्यार्थिनीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाळेत पोहोचून प्राथमिक चौकशी सुरू केली.

वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदार श्रीदेवी पाटील यांच्या माहितीनुसार, शाळेतील सुमारे 10 ते 12 विद्यार्थिनींचे इन-कॅमेरा जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये काही विद्यार्थिनींनी शिक्षकाकडून अयोग्य स्पर्श आणि लैंगिक स्वरूपाचा त्रास दिला जात असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
काही विद्यार्थिनींनी हा प्रकार तिसरीच्या वर्गापासून सुरू असल्याची माहिती दिल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, या आरोपांची सविस्तर चौकशी सुरू असून, आणखी किती विद्यार्थिनी या प्रकाराला बळी पडल्या आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : 80s Photo Trend: AI फोटो बनवताना सावधान! ‘या’ चुका टाळा, नाही तर होऊ शकतो…

गावकऱ्यांकडून शिक्षकाला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद

प्रकाराची माहिती गावात पसरल्यानंतर शाळेच्या परिसरात अनेक महिला आणि पुरुष जमा झाले होते. यावेळी शिक्षकाच्या कथित कृत्याबाबत गावकऱ्यांनी त्याला मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून, विद्यार्थिनींचे जबाब, तक्रारीतील आरोप आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts