Bengaluru Family Murder Case: पती पत्नीचा वाद झाला, पतीने आपल्याच पत्नीच्या डोक्यात वरवंटा मारला आणि तिच्यासोबत सहा जणांचा गेम वाजवला, मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले, काय घडलं त्या महिलेसोबत? त्या महिलेसोबत सापडलेले ते सहा जणांचे मृतदेह कणाचे होते ? आणि एका कॅब ड्रायव्हरने कसा रचला हा खुनी खेळ ?
कौटुंबिक वादातून हत्याकांडाचा संशय
या थरारक कहाणीची सुरुवात होते इंदुशेखर आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यातील वादापासून. इंदुशेखर हा पेशाने कॅब ड्रायव्हर होता. त्याचं आणि सुनीताचं लग्न होऊन अनेक वर्षे झाली होती, पण त्यांच्यात सतत खटके उडायचे. सुनीता ही सतत तिच्या माहेरच्या लोकांच्या संपर्कात असायची, त्यांच्या सल्ल्याने वागायची आणि हीच गोष्ट इंदुशेखरला खटकत होती. माहेरच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे आपलं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा राग इंदुशेखरच्या मनात धुमसत होता. हा राग वर्षानुवर्षे मनात साचत गेला आणि शेवटी त्या रागाचं रूपांतर एका भीषण नरसंहारात झालं. त्याने सासरच्या संपूर्ण वंशाचा दिवा विझवण्याचा आणि एकेकाला संपवण्याचा एक भयंकर मास्टरप्लॅन तयार केला.
प्लॅननुसार, इंदुशेखरने सर्वात आधी स्वतःच्या घरात, म्हणजेच बेंगळुरूच्या राजाजीनगर परिसरातील भाषम सर्कल येथील घरी आपली पत्नी सुनीता हिला टार्गेट केलं. घरात कोणी नसताना त्याने सुनीतावर पाटा-वरवंट्याने वार केले आणि तिला जागीच संपवून टाकलं. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने थंड डोक्याने पुरावे नष्ट करण्याची तयारी सुरू केली. त्याने सुनीताचा मोबाईल फोन ताबडतोब बंद केला. सासरच्या लोकांचा किंवा कोणाचाही फोन आला किंवा कोणी विचारणा केली, तर बायको सहलीला गेली आहे, म्हणून तिचा फोन लागत नाहीये, असा खोटा बनाव त्याने रचला. पत्नीचा मृतदेह एका कपड्यात गुंडाळून त्याने आपल्याच कॅबमध्ये टाकला आणि कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या नंदी हिल्सच्या जंगलात नेऊन फेकून दिला.
सासरच्या कुटुंबाला संपवण्यासाठी आखल्याचा आरोप असलेला कट (Bengaluru Family Murder Case)
पण इंदुशेखर एवढ्यावरच थांबणारा नव्हता, त्याचा मुख्य प्लॅन तर आता सुरू होणार होता. त्याची सासू, मेहुणे आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी त्याने एक-एक करून जाळं टाकायला सुरुवात केली. त्याने आपले दोन्ही मेहुणे, म्हणजेच शिवकुमार आणि शंकर यांना चला आपण पार्टी करूया असं सांगून बोलावून घेतलं. मेहुण्यांना वाटलं की जावई नेहमीप्रमाणे पार्टी देतोय, म्हणून ते कोणत्याही संशयाशिवाय आले. तिथे इंदुशेखरने या दोघांना दारू पाजली आणि गाफील ठेवून त्यांची निर्घृण हत्या केली. मेहुण्यांचा काटा काढल्यानंतर त्याचा मोर्चा वळला तो सासरच्या घरातील महिला आणि लहान मुलाकडे.
त्याने मेहुण्यांच्या पत्नी, म्हणजेच दिव्या आणि नलिनी, आणि त्याची वृद्ध सासू रूपवती यांनाही वेगवेगळ्या बहाण्याने गाठून त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. या हत्याकांडात त्याने शंकर यांच्या अवघ्या ७ वर्षांच्या निष्पाप पुनीत नावाच्या चिमुकल्या मुलालाही सोडलं नाही. त्याने त्या ७ वर्षांच्या मुलाचाही गळा दाबून खून केला. एकामागून एक १२ ते १५ दिवसांत तब्बल ७ जणांचे मृतदेह इंदुशेखरने आपल्या कॅबमधून वेगवेगळ्या निर्जन ठिकाणी, जंगलात, रस्त्याच्या कडेला आणि चार्मडी घाटाच्या परिसरात नेऊन फेकले. घरात पडलेले रक्ताचे डाग आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने बाजारातून खास केमिकल आणलं होतं, त्या केमिकलने त्याने संपूर्ण घर धुवून काढलं जेणेकरून फॉरेन्सिक टीमला रक्ताचा एक थेंबही सापडू नये.
त्याने त्याच्या पत्नी आणि इतर तीन महिलांच्या मृतदेहांवरील सोन्याचे दागिने काढून ते विकलेआणि पैसे घेतले….
सगळं काही प्लॅननुसार झालं होतं, ७ जणांची हत्या करूनही इंदुशेखर अगदी बिनधास्त फिरत होता. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी नशीब त्याला एक चूक करायला भाग पाडतंच, तसंच काहीसं इथेही झालं. इंदुशेखरने शंकर यांच्या ११ वर्षांच्या मोठ्या मुलालाही मारण्याचा प्लॅन केला होता. पण तो मुलगा वाचला. इंदुशेखर त्या मुलाला गाडीत बसवून बेंगळुरू विमानतळ, सुब्रह्मण्य मंदिर, धर्मस्थळ आणि शृंगेरी अशा वेगवेगळ्या धार्मिक आणि लांबच्या ठिकाणी फिरवत होता. या प्रवासादरम्यान तो ११ वर्षांचा मुलगा गाडीतच होता आणि त्याने पाहिलं की त्याचा काका गाडीतून जागोजागी काही मोठ्या पिशव्या फेकत चालला आहे.
हेही वाचा : पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?
बेपत्ता कुटुंबाचा शोध घेताना पोलिसांना काय आढळले? (Karnataka Crime)
आता प्रश्न असा पडतो की, एवढं मोठं कांड अखेर पोलिसांसमोर आलं कसं? तर झालं असं की, एकाच कुटुंबातील एवढे लोक अचानक बेपत्ता झाल्यामुळे आणि कोणाचेच फोन लागत नसल्यामुळे सासरच्या इतर नातेवाईकांना संशय आला. त्यांनी बेंगळुरूच्या श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात जाऊन कुटुंब बेपत्ता असल्याची रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना समजलं की, बेपत्ता होण्यापूर्वी हे सर्वजण जावई इंदुशेखरच्या संपर्कात होते. पोलिसांनी संशयाच्या आधारे इंदुशेखरला ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी सुरू केली.
चौकशी दरम्यान इंदुशेखरने पोलिसांना सुरुवातीला खूप फिरवलं. तो म्हणाला की, बायको आणि तिचे घरचे सगळेजण सहलीला गेले आहेत, मला काही माहीत नाही. पण पोलिसांनी जेव्हा त्याचा आणि बेपत्ता लोकांचा मोबाईल लोकेशन डेटा, कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा इंदुशेखरच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. पोलिसांच्या कडक खाक्यासमोर अखेर इंदुशेखरची भंबेरी उडाली आणि त्याने पोपटासारखं बोलायला सुरुवात केली. त्याने पोलिसांसमोर कबुली दिली की, होय, मीच त्या ७ जणांना संपवलंय!
पोलिसांना आतापर्यंत किती मृतदेह सापडले? (Indushekhar Murder Case)
इंदुशेखरच्या या धक्कादायक कबुलीमुळे पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी तात्काळ आरोपीने दाखवलेल्या ठिकाणांवर शोध मोहीम राबवली. पोलिसांनी नंदी हिल्सच्या (Nandi Hills) पायथ्याशी सुमारे ४ तास सर्च ऑपरेशन चालवलं, तिथे पोलिसांना ७ वर्षांच्या निष्पाप पुनीतचा मृतदेह सापडला. तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यातील जंगल परिसरातून सुनीता आणि तिची आई रूपवती यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे सापडलेल्या मृतदेहांची संख्या तीन झाली आहे. इतर ४ जणांचे मृतदेह शोधण्यासाठी पोलीस आता चार्मडी घाट आणि इतर घनदाट जंगलात शोध घेत आहेत, कारण आरोपीने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी केमिकल्स आणि वेगवेगळ्या दुर्गम जागांचा वापर केला होता.
एका जावयाच्या मनात सासरच्यांबद्दल असलेल्या २० वर्षांच्या जुन्या रागाने आणि सूडाच्या भावनेने एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत केला. स्वतःच्या पत्नीला मारून ती सहलीला गेल्याचा बनाव रचणारा हा नराधम आता पोलिसांच्या कोठडीत असून, खाकी वर्दी त्याच्याकडून या भीषण हत्याकांडाचा एकेक धागादोरा गोळा करत आहे. हे बेंगळुरूमधील आजवरच्या सर्वात भीषण आणि क्रूर हत्याकांडांपैकी एक मानलं जात आहे.








