Vaibhav Chavan Death Case : पोलीस भरतीचा मोठा घोटाळा उघड करणारा बीडचा २४ वर्षांचा वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) गेला! पण त्याचा मृत्यू झालाय की गेम केला? गळफास घेतलेल्या अवस्थेत बॉडी भेटली खरी, पण अंगावर मारहाणीचे काळेनिळे वळ आहेत. मृत्यूच्या आधीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीये, ज्यात तो ओरडून सांगतोय की हे मला अपघात घडवून मारतील….अख्ख्या महाराष्ट्राचा थरकाप उडवणाऱ्या या बीडच्या क्राईम मिस्ट्रीची हीच ती आतली गोष्ट.
बीडच्या इमामपूर शिवारात काय घडलं?
सुरुवात होते धाराशिवच्या पोलीस भरतीपासून. वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) हा स्वतः नॅशनल लेव्हलचा कराटेपटू. छाती ठोकून ग्राउंड मारणारा गडी. खेळाडू कोट्यातून पोलीस होऊन खाकी वर्दी अंगावर चढवायची आणि देशाची सेवा करायची, हे त्याचं स्वप्न होतं. पण जेव्हा फायनल लिस्ट आली, तेव्हा वैभवचं नाव वेटिंगला पडलं. ज्यांची निवड झाली, त्यांची नावं बघून वैभवला संशय आला. कारण ज्या पोरांना त्याने कधी मैदानावर घाम गाळताना बघविलं नव्हत, ती पोरं पोलीस दलात भरती झाली होती. वैभवने सिस्टीमशी लढायचं ठरवलं आणि सिलेक्ट झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची कुंडली काढायला सुरुवात केली. तिथेच त्याला एका खेळाचं नाव सापडलं—कुराश. हा मध्य आशियाई कुस्तीचा प्रकार.
मजेची गोष्ट म्हणजे, ज्या पोरांनी आयुष्यात कधी कुराशची मॅट पण बघितली नव्हती, ज्यांना या खेळाचे नियम पण ठाऊक नव्हते, त्यांच्याकडे नॅशनल मेडलचे सर्टिफिकेट होते. खेळाडू कोट्यातून पोलीस होण्यासाठी हा कोट्यवधींचा झोल सुरू होता. खेळाडू कोट्यासाठी मिळणाऱ्या आरक्षणाचा गैरवापर करून, खऱ्या आणि हक्काच्या खेळाडूंचे भविष्य अंधारात ढकलून हा बोगसगिरीचा बाजार उघडपणे मांडला गेला होता. एका एका प्रमाणपत्रासाठी ५ ते १० लाख रुपये मोजले जात होते आणि या पैशांच्या जोरावर अनेक बोगस उमेदवार पोलीस खात्यात एंट्री मारत होते.
वैभव चव्हाणने बोगस प्रमाणपत्रांचं रॅकेट कसं उघड केलं? (Vaibhav Chavan)
वैभव शांत बसणाऱ्यांमधला नव्हता. आपल्यावर आणि इतर प्रामाणिक खेळाडूंवर झालेला हा अन्याय त्याला सहन झाला नाही. त्याने केवळ आरोप केले नाहीत, तर तो स्वतः दलाल आणि एजंट्सच्या मागे लागला. त्याने एकेक पुरावा गोळा केला आणि थेट पुण्याच्या बालेवाडी क्रीडा आयुक्तालयात पोहोचला. तिथे त्याने क्रीडा उपसंचालक आणि आयुक्त यांच्याकडे पुराव्यांसकट विषय मांडला. मॅटर एवढं तापलं की पुणे क्राईम ब्रांचने यात उडी घेतली. तपासाची चक्रं फिरली आणि अख्खा महाराष्ट्र हादरला. वैभवच्या एका तक्रारीमुळे बोगस सर्टिफिकेटवर नोकरीला लागलेल्या तब्बल १४ पोलिसांना तडकाफडकी सस्पेंड करण्यात आले. एवढंच नाही, तर हे रॅकेट चालवणाऱ्या कुराश असोसिएशनचा नॅशनल प्रेसिडेंट विठ्ठल नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ५ ते १० लाखाला एक सर्टिफिकेट विकणारं कोल्हापूर-पुण्याचं भलंमोठं रॅकेट एका झटक्यात उद्ध्वस्त झालं. अनेक मोठे अधिकारी, दलाल आणि एजंट्सचे चेहरे समोर आले. या कारवाईमुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण ज्या तरुणाने ही सिस्टीम साफ करण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला, तोच आता या माफियांच्या रडारवर आला होता.
मृत्यूपूर्वीच्या व्हायरल ऑडिओमध्ये काय दावा करण्यात आला? (vaibhav chavan audio clip)
इथूनच खरा गेम सुरू झाला. कोट्यवधींची दुकानदारी बंद झाल्यामुळे हे माफिया वैभवच्या मागे लागले. धमक्यांचे सत्र सुरू झाले. त्याला अज्ञात क्रमांकावरून सतत फोन येऊ लागले. ‘तक्रार मागे घे, नाहीतर संपवून टाकू’ अशा धमक्या त्याला दिल्या जात होत्या. मात्र, जेव्हा त्याला समजले की आता पाणी डोक्यावरून गेले आहे आणि आपला पत्ता कट करण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली जात आहे, तेव्हा त्याने आपल्या एका विश्वासू मित्राला दोन ऑडिओ क्लिप रेकॉर्ड (vaibhav chavan audio clip) करून पाठवल्या. त्या क्लिपमधील वैभवचा घाबरलेला आवाज, तो म्हणतो, “माझ्या जीवाला धोका आहे. हे लोक खूप मोठे आहेत. हे माझ्या मागे हात धुवून लागलेत. मला सतत धमक्या येत आहेत. ते मला सोडणार नाहीत, ते मला अपघात घडवून मारतील.. त्याने क्लिपमध्ये विठ्ठल नागर, शिवाजी साळुंखे आणि कोल्हापूरच्या पुनगावकर दाम्पत्याचं नाव उघडपणे घेतलं होतं. मला मारून याला अपघाताचं किंवा आत्महत्येचं रूप दिलं जाईल, ही भीती वैभवला आधीच होती. आणी अखेर गुरुवारी तीच भीती खरी ठरली. बीड ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत, इमामपूर शिवारातल्या एका शेतातील लिंबाच्या झाडाला वैभवची बॉडी लटकताना सापडली. घटनास्थळाची परिस्थिती बघूनच हा साधा सुसाईडचा मर्डर गेम असल्याचा संशय बळावला. सगळ्यात मोठी शंका म्हणजे, वैभवचे पाय जमिनीच्या एकदम जवळ होते. जर कोणी गळफास घेतो, तर त्याची बॉडी हवेत लटकते, पण इथे तसं नव्हतं.
त्याहूनही भयंकर गोष्ट म्हणजे, वैभवच्या पाठीवर, अंगावर आणि विशेषतः दोन्ही पायांवर काठीने अमानुष मारहाण केल्याचे काळेनिळे वळ स्पष्ट दिसत होते. जो गडी स्वतः नॅशनल कराटे चॅम्पियन आहे, जो ब्लॅक बेल्ट आहे, जो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या एवढा खंबीर आहे, तो स्वतःला आधी एवढं बदडून घेईल आणि मग सुसाईड करेल का? स्वतःला इतक्या वेदना देऊन कोणी गळफास कसा घेऊ शकतं? हाच मोठा प्रश्न नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी उपस्थित केला. हा सरळ-सरळ पूर्वनियोजित खून आहे, आधी त्याला कुठेतरी डांबून ठेवून अमानुष मारहाण करण्यात आली आणि नंतर त्याचा गळा दाबून त्याला झाडाला लटकवून दिलं गेलं, जेणेकरून हा आत्महत्येचा गुन्हा वाटेल, असा थेट आरोप केला गेला.
या संतापामुळे वैभवच्या नातेवाईकांनी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाबाहेर मृतदेह ताब्यात घेण्यास साफ नकार दिला. रुग्णालयाच्या आवारात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तब्बल १२ तास ठिय्या आंदोलन चाललं. जोपर्यंत हत्येचा गुन्हा दाखल होत नाही आणि ऑडिओ क्लिपमध्ये नाव असलेल्या मोठ्या माशांना अटक होत नाही, तोपर्यंत बॉडी उचलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेवटी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याचं, तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर, रात्री उशिरा कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
हेही वाचा : दुधाच्या टँकरला लटकलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह! आत्महत्या की घातपात?
बीड पोलिसांच्या तपासात काय समोर आलं? (Vaibhav Chavan Death Case)
आता मूळ मुद्दा येतो तपासाचा. बीड पोलिसांनी सध्या या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केलीये. प्राथमिक मेडिकल रिपोर्ट इनक्युरीमध्ये मृत्यूचं कारण दम कोंडल्याने झालं असल्याचं म्हटलंय. पण डॉक्टरांनी देखील शरीरावर असलेल्या मारहाणीच्या जखमांची आणि वळांची डायरीत नोंद केलीये. पोलीस आता फॉरेन्सिक आणि व्हिसेरा रिपोर्टची वाट बघतायत. या रिपोर्टमधून स्पष्ट होईल की मारहाण गळफास घेण्याच्या आधी झाली की नंतर. जर या जखमा मृत्यूच्या आधीच्या असतील, तर पोलिसांना या केसमध्ये हत्येचं कलम जोडावं लागेल.
दुसरीकडे, पोलिसांनी वैभवच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि इंटरनेट डेटा तपासणं सुरू केलंय. मृत्यूच्या आदल्या रात्री किंवा काही दिवस आधी त्याला कोणाकोणाचे फोन आले होते? व्हॉट्सॲपवर त्याला काय मेसेज आले होते? तो इमामपूर शिवारात स्वतःच्या मर्जीने गेला होता की त्याला ट्रॅप लावून तिथे बोलावण्यात आलं होतं, की त्याचं अपहरण करून त्याला तिथे नेण्यात आलं होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केलाय. वैभवचे शेवटचे लोकेशन आणि संशयितांचे मोबाईल टॉवर लोकेशन मॅच केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाने सिस्टीमच्या क्रूरतेवर आणि भ्रष्टाचाराच्या भयानक रूपावर पुन्हा एकदा बोट ठेवलंय. एका सामान्य कुटुंबातील प्रामाणिक तरुण, जो देशाची सेवा करण्यासाठी पोलीस दलात जाऊ पाहत होता, त्याने सिस्टीममधला कचरा साफ करायचा प्रयत्न केला. त्याने दाखवलेल्या धाडसामुळे एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला, पण आज त्याचाच संशयास्पद अंत झालाय. जर भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या, घोटाळे उघड करणाऱ्या धाडसी तरुणांना असं संपवलं जाणार असेल, तर भविष्यात सिस्टीममधल्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्याची हिंमत कोण करेल? बीड पोलीस आता या प्रकरणाचा छडा लावून त्या ऑडिओ क्लिपमधील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार की ही फाईल सुसाईड म्हणून बंद होणार, याकडे आता केवळ बीडचेच नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.







