Sharad Pawar Health: देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातला धुरंधर व्यक्ती ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आज रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी चिंता आणि उत्सुकता पाहायला मिळत आहे. गौतम अदानी यांनी आज सकाळीच शरद पवारांची ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतलीये, पंतप्रधान नरेंद्र मोडी, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह देशातील सर्वोच्च नेत्यांनी फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे, तर प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, संजय राऊत सुनेत्रा पवार यांनीही रुग्णालयात जाऊन भेट शरद पवारांची भेट घेतलीये, विरोधक आणि समर्थक अशा सर्वच पक्षांतील नेत्यांची ही रिघ पाहून सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, नक्की चाललंय काय? शरद पवार यांची प्रकृती खरोखरच खूप गंभीर आहे का? त्यांना नेमका काय आजार झाला आहे आणि यावर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे काय म्हणणे आहे?
शरद पवारांची प्रकृती सध्या कशी आहे? (Sharad Pawar Health)
शरद पवार यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र खोकला आणि छातीत कफ जमा होण्याचा त्रास होत होता. वाढत्या वयामुळे उद्भवलेल्या या त्रासानंतर सुरुवातीला त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथून प्राथमिक उपचार करून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, पुढील सखोल वैद्यकीय तपासण्या आणि उपचारांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) हलवण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्यामाहितीनुसार, शरद पवार यांच्या प्रकृतीचे सर्व महत्त्वाचे वैद्यकीय रिपोर्ट म्हणजेच रक्ताच्या चाचण्या, छातीचे स्कॅन आणि इतर तपासण्या पूर्णपणे नॉर्मल आल्या आहेत. याचा अर्थ असा की त्यांच्या शरीरातील मुख्य अवयव सुरळीत काम करत असून काळजी करण्यासारखी कोणतीही गंभीर परिस्थिती नाही. डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, हा आजार केवळ बदलत्या वातावरणामुळे झालेला व्हायरल इन्फेक्शन, तीव्र खोकला आणि त्यातून आलेला अशक्तपणा आहे. मात्र, पवारांचे वय पाहता कोणत्याही प्रकारचा संसर्ग वाढू नये आणि त्यांच्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळावी, म्हणूनच त्यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस पूर्ण बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिलाय….
आता प्रश्न येतो की जर त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर मग राजकीय नेत्यांची एवढी मोठी गर्दी का होत आहे आणि राष्ट्रीय पातळीवरून फोन का येत आहेत? याचे उत्तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत आणि त्यांच्या वैयक्तिक संबंधांमध्ये दडलेले आहे. शरद पवार हे भारतीय राजकारणातील असे व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांचे संबंध केवळ त्यांच्या स्वतःच्या पक्षापुरते मर्यादित नाहीत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सर्वांशी त्यांचे अत्यंत जुने आणि कौटुंबिक संबंध आहेत. राजकारणात कितीही मतभेद असले, तरी अशा संकटसमयी किंवा आजारपणात सर्वपक्षीय नेते एकत्र येतात ही महाराष्ट्राची आणि देशाची राजकीय संस्कृती राहिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी शरद पवारांना फोन करून आराम करण्याचा सल्ला दिला आहे तर, सुप्रिया आणि आम्ही मिळून देश सांभाळू, तुमचा आशीर्वाद राहुद्या लवकर बरे व्हा असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय, राहुल गांधी यांनीही फोन करून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करत असताना त्यांना विश्रांती घेण्याचा हक्क हक्काने बजावला. उद्धव ठाकरे यांनीही फोन करून त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केलीये.
हेही वाचा : राज ठाकरेंच्या नातीचं नाव ठरलं! नावामागे 300 वर्षांचा इतिहास
अदानी, प्रफुल्ल पटेल आणि संजय राऊत यांची रुग्णालयात भेट
या फोन कॉल्सपेक्षाही जास्त चर्चा झाली ती रुग्णालयात झालेल्या प्रत्यक्ष भेटींची. उद्योगपती अदानी यांनी स्वतः आज शरद पवारांची रुग्णालयात जावून भेट घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर प्रफुल्ल पटेल हे अजित पवार गटात गेले. मात्र, ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांनी शरद पवारांची घेतलेली भेट ही पूर्णपणे कौटुंबिक आणि सदिच्छा भेट होती. या भेटीनंतर स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पवार साहेब नेहमीच्याच उत्साहात दिसले आणि त्यांनी रुग्णालयाच्या खाटेवरूनही देशातील राजकीय घडामोडींची अगदी हसतमुख वातावरणात चौकशी केली. यावरूनच हे स्पष्ट होते की शरद पवारांची तब्येत गंभीर नाही, तर ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. दुसरीकडे, संजय राऊत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही भेट घेतलीये…
या सर्व घडामोडींमुळे सोशल मीडियावर आणि जनतेमध्ये अफवांचे पेव फुटले होते की पवारांची तब्येत अत्यंत चिंताजनक आहे. परंतु, आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी जनतेला आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पवार साहेबांची प्रकृती स्थिर आहे, केवळ डॉक्टरांनी त्यांना जास्त बोलण्यास मनाई केली आहे कारण बोलण्यामुळे छातीवर ताण येतो आणि खोकला वाढतो. त्यामुळेच त्यांचे आगामी सर्व दौरे, सभा आणि नियोजित कार्यक्रम तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत.
शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार? (Sharad Pawar Hospital)
शरद पवार हे भारतीय राजकारणाचे केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांच्या साध्या आजारपणाची बातमीही देशात मोठी खळबळ उडवून देते. त्यांना कोणताही गंभीर किंवा जीवघेणा आजार झालेला नाही. वाढत्या वयानुसार होणारा खोकला, कफ आणि थकवा यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital) तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सर्व बडे नेते आणि विरोधक त्यांना भेटायला येत आहेत कारण पवारांचे वलय आणि त्यांचे वैयक्तिक संबंध पक्षाच्या सीमा ओलांडून पलीकडे गेलेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही, पवार साहेब लवकरच बरे होऊन पुन्हा एकदा सक्रिय होतील असा विश्वास डॉक्टरांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.








