Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’… नाशिकचा तो भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat Movie) आणि त्याच्या लफड्यांची काळी हिडीस कथा आता मोठ्या पडद्यावर येतीये. या सिनेमाचे जे २ टीझर आलेत, त्याने सोशल मीडियाचा पारा पुरता तापवलाय. खरातबाबाची भूमिका आता पडद्यासमोर आलीये, कोण आहे अशोक खरातच्या भूमिकेत ? या सिनेमाचा संपूर्ण लेखाजोखा, त्यातली पात्रं, वाद आणि पडद्यामागची खरी गोष्ट काय आहे पाहूयात….
अशोक खरात प्रकरणाशी संबंधित चित्रपटाची कथा काय? (Ashok Kharat Movie)
सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल’ (Maharashtra Epstein Files) या सिनेमात मराठी आणि बॉलिवूडमधली तगडी स्टारकास्ट उतरवण्यात आलीये, आणि प्रत्येकाचा लूक एकदम वादळ उठवणारा आहे. सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे बाबा थोरातची, जी अशोक खरातच्या आयुष्यावर बेतलेली आहे. ही मुख्य भूमिका ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी साकारलीये. पांढरी शुभ्र लांब दाढी, गळ्यात माळा, कपाळाला टिळा आणि डोळ्यात वासना असलेला भोंदूबाबा त्यांनी पडद्यावर जिवंत केलाय. खरातच्या हुबेहूब लूक आणि त्या सायको देहबोलीमुळे ट्रेलर बघताना अंगावर काटा येतो.
दुसरीकडे तत्कालीन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरून प्रेरित झालेली एक फायरब्रँड महिला नेत्या आपल्याला पाहायला मिळते. ही भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यदने साकारली असून, तिने बऱ्याच गॅपनंतर या भूमिकेतून पडद्यावर कडक कमबॅक केलंय. सिनेमात राज्याची कायदा-सुव्यवस्था सांभाळणारा आणि थेट गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भूमिकेशी साधर्म्य असणारं एक कडक कॅरेक्टर आहे, जे अभिनेता सुबोध भावेने साकारलंय. ट्रेलरमध्ये त्याचा “कोणाचीही गय केली जाणार नाही…” हा डायलॉग सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय.
हेही वाचा : Maharashtra Court Bomb Threat : परभणी, सातारा, पुणे, पंढरपूरसह अनेक न्यायालयांना धमकीचे ई-मेल; प्रशासन सतर्क
दोन टीझरमधून कोणती कथा समोर येते?
तसेच या भोंदूबाच्या जाळ्यात अडकलेली, सोसलेली आणि नंतर अन्यायाविरुद्ध बंड पुकारून कोर्टात उभी ठाकलेली एक हिंमतवान पीडित महिला यात अभिनेत्री तेजस्विनी पंडितने जिवंत केलीये. यांच्यासोबतच अनेक तगडे सहकलाकार कोर्टातील वकील, पोलीस अधिकारी आणि राजकारण्यांच्या भूमिकेत परफेक्ट फिट बसले आहेत. मेकर्सनी लागोपाठ जे २ टीझर आणि ट्रेलर सोडलेत, त्यातून सिनेमाची थरारक आणि तितकीच धक्कादायक कथा समोर येते.
पहिल्या टीझरमध्ये सुरुवातीला दाखवलंय की हा बाबा अध्यात्माचा बुरखा पांघरून स्वतःचं साम्राज्य कसं उभा करतो. राजकारणी, बिझनेसमन आणि व्हीआयपी लोक त्याच्या पायाशी लोटांगण घालताना दिसतात. त्यानंतरच्या दुसऱ्या टीझरमध्ये मात्र कथेचा खरा भयानक चेहरा समोर येतो. आश्रमाच्या त्या बंद दारांआड नेमकं काय चालायचं, महिलांचं कसं क्रूर लैंगिक शोषण केलं जायचं आणि अमेरिकेच्या त्या बदनाम ‘एपस्टिन’सारखं हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेट हा बाबा आपल्या ताकदीच्या जोरावर कसा चालवायचा, याची भयंकर झलक मेकर्सनी दाखवलीये.
हा सिनेमा सहज बनलेला नाही, याच्या मेकिंगच्या मागे मोठा राडा झाला होता आणि चित्रपट प्रचंड अडचणीत सापडला होता. पहिली अडचण तेव्हा आली जेव्हा या सिनेमाची घोषणा झाली आणि दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका करणार असं समोर आलं. तेव्हा चाकणकर पुरत्या भडकल्या होत्या आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, माझ्या परवानगीशिवाय किंवा महिला आयोगाची बाजू नीट न समजून घेता जर काही चुकीचं किंवा एकतर्फी दाखवलं, तर आम्ही ते अजिबात खपवून घेणार नाही. दुसरी मोठी अडचण म्हणजे सन्सॉर बोर्डाचा अॅक्शन मोड. विषय नाशिकच्या अशोक खरातच्या खऱ्या प्रकरणावर आणि त्यातल्या हाय-प्रोफाइल राजकीय नावांवर बेतलेला असल्यामुळे सन्सॉर बोर्डाने याला सहजासहजी क्लिअरन्स द्यायला नकार दिला होता.
चित्रपटातील पात्रांची नावे आणि वास्तविक घटनांशी साधर्म्याचा प्रश्न
इतकंच नाही तर काही विशिष्ट गटांकडून सिनेमावर बंदी आणण्याची मागणीही झाली होती. या कायदेशीर कचाट्यातून सुटण्यासाठी निर्मात्यांना चित्रपटात रिअल नावं बदलून खऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) ऐवजी बाबा थोरात असं नाव वापरावं लागलं आणि बऱ्याच वादांनंतर चित्रपटाला मंजुरी मिळाली. याशिवाय पडद्यामागे दीपाली सय्यद आणि दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्यातही या सिनेमाच्या मेकिंग आणि हक्कांवरून काही अंतर्गत वाद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, ज्यामुळे सिनेमाचं शूटिंग आणि पोस्ट-प्रोडक्शन काम काही काळ चांगलंच रेंगाळलं होतं.
आता या सगळ्या अडचणींवर, कायदेशीर नोटीसवर आणि अंतर्गत वादांवर यशस्वी मात करत, टीझरच्या धुमाकळानंतर हा सिनेमा अखेर थिएटर्समध्ये धुमाकूळ घालण्यासाठी एकदम सज्ज झालाय. हा सिनेमा २० नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. थोडक्यात सांगायचं तर, हा फक्त एक क्राईम थ्रिलर नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या काळ्या धंद्याला उघडं पाडणारा एक धाडसी प्रयत्न आहे. थिएटर्समध्ये हा सिनेमा काय राडा करतो आणि बॉक्स ऑफिसवर काय वादळ आणतो, हे बघणं आता खूप महत्त्वाचं ठरेल….




