गोकुळच्या राजकारणात नवा ट्विस्ट! हसन मुश्रीफांनी घेतली चंद्रकांत पाटलांची भेट; काय ठरलं?
Gokul Politics: गोकुळच्या सत्तासंघर्षासाठी पडद्यामागे हालचाली? मुश्रीफ-पाटील भेटीने चर्चांना उधाण
गोकुळमध्ये सत्तेची नवी समीकरणे जुळणार? हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा
Gokul Politics : गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले. गोकुळ प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असताना या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेला वाद आता न्यायालयीन पातळीवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. गोकुळमधील पुढील घडामोडी आणि सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोकुळच्या पुढील रणनीतीबाबत चर्चा?
गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समर्थक आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुती समर्थित आघाडीला १२ जागा मिळाल्या. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेल्या १४ संचालकांच्या गणपूर्तीचा प्रश्न निर्माण झाल्याने अध्यक्ष निवडीचा पेच वाढला. दरम्यान, शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयामुळे गोकुळमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
अशा परिस्थितीत मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. गोकुळ प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडी, शासनाच्या निर्णयाबाबतची भूमिका आणि अध्यक्ष निवडीसंदर्भातील रणनीती यावर चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भेटीतील चर्चेचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. आता या भेटीनंतर गोकुळच्या सत्तासंघर्षात कोणती नवी भूमिका समोर येते, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








