Sahyadri Forest Cutting : महाराष्ट्रात कर्जतच्या जंगलोतोड मुद्य्यावरून राजकारण चांगलंच पेटलेलं असतांना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठा खुलासा केलाय…आंबेडकरांनी महायुती सरकार, इलेक्टोरल बाँड्सचा पैसा, पर्यावरणाचा ऱ्हास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. सह्याद्रीच्या रांगांमध्ये सुरू असलेला हा खेळ नेमका काय आहे? डेटा सेंटरच्या नावाखाली महाराष्ट्राचे पाणी कोणासाठी वळवले जातेय? जनतेचं लक्ष भरकटवल जातंय का ?
सह्याद्रीच्या जंगलतोडीवरून महाराष्ट्रात वाद का पेटला? (Sahyadri Forest Cutting)
पश्चिम महाराष्ट्राची जीवनवाहिनी आणि जैवविविधतेचा मानबिंदू असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत (Sahyadri Cutting) रांगा सध्या धोक्यात आल्या आहेत. जिथे नवीन जीव निर्माण होतात, निसर्गाचे अद्भुत चक्र चालते, तो सह्याद्रीचा भाग वाळवंत करायला हे सरकार निघाले आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. रायगड जिल्ह्यात केवळ टोरंटचा प्रकल्प नाही, तर असे एकूण ५ मोठे प्रकल्प येत आहेत, ज्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
आंबेडकरांनी यामागचा सर्वात मोठा आणि धक्कादायक छुपा अजेंडा उघड केला आहे. हा अजेंडा आहे डेटा सेंटर्सचा….. अमेरिकेतून ज्या डेटा सेंटर्सना तिथल्या पर्यावरणाला आणि पाण्याच्या साठ्याला धोका निर्माण झाल्यामुळे हाकलून लावले जात आहे, त्या डेटा सेंटर्सना भारतात, विशेषतः महाराष्ट्रात रेड कार्पेट अंथरले जात आहे. यासाठी अदानी समूहासोबत टाय-अप करण्यात आले असून, महाराष्ट्रातील धरणांचे पाणी या डेटा सेंटर्सना थंड ठेवण्यासाठी वापरले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचा रोजगार निर्मितीचा दावा पूर्णपणे खोटा असून, डेटा सेंटर्समुळे कोणतीही मोठी रोजगार निर्मिती होत नाही, उलट महाराष्ट्राचे पाणी आणि पर्यावरण मात्र कायमचे नष्ट होणार आहे. असं आंबेडकरांनी म्हटलंय….
कोणत्या राजकीय पक्षाला किती देणग्या मिळाल्या? (torrent power electoral bonds)
निसर्गाचा हा विनाश सरकारी पातळीवर इतक्या सहज कसा मंजूर होतो? याचे उत्तर प्रकाश आंबेडकरांनी आकडेवारीनिशी दिले आहे. हे उत्तर आहे, इलेक्टोरल बाँड्स म्हणजेच राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या….. टोरंट पॉवर आणि टोरंट फार्मास्युटिकल्स या कंपन्यांनी देशातील आणि राज्यातील प्रमुख पक्षांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.
टोरंट पॉवरकडून मिळालेल्या देणग्या:
भाजप: ७६ कोटी रुपये
काँग्रेस: १७ कोटी रुपये
आम आदमी पार्टी (AAP): ७ कोटी रुपये
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP): ३.५ कोटी रुपये
शिवसेना: ३ कोटी रुपये
टोरंट फार्मास्युटिकल्सकडून मिळालेल्या देणग्या:
भाजप: ६१ कोटी रुपये
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा: ७ कोटी रुपये
काँग्रेस: ५ कोटी रुपये
समाजवादी पार्टी: ३ कोटी रुपये
आम आदमी पार्टी: १ कोटी रुपये
दोन्ही कंपन्यांनी मिळून एकट्या भाजपला १३७ कोटी रुपये आणि काँग्रेसला २२ कोटी रुपये दिले आहेत. २०२२ ते २०२४ या काळात जेव्हा हे इलेक्टोरल बाँड्स घेतले गेले, तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुलाचाही या संपूर्ण प्रकरणाशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप आंबेडकरांनी केला आहे. या पैशांच्या बदल्यातच महाराष्ट्राची नैसर्गिक संसाधने टोरंट आणि अदानी सारख्या बड्या कॉर्पोरेट्सच्या घशात घातली जात आहेत का? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा : अशोक खरातची भूमिका कोण साकारणार? महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’मध्ये कोण कोणते कलाकार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आंबेडकरांनी काय आरोप केले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ‘एप्सटीन फाईल्स’मध्ये आहे, म्हणूनच ते प्रचंड दबावाखाली काम करत आहेत. मी हे जाहीरपणे बोलतोय. जर मी चुकीचे बोलत असेल, तर पंतप्रधान मोदींनी माझ्यावर गुन्हा दाखल करावा, माझ्यावर केस करावी. मी त्यांच्या कायदेशीर कारवाईची वाट पाहत आहे. असं आंबेडकरांनी म्हटलंय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत वादग्रस्त आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या एप्सटीन फाईल्सचा संबंध देशाच्या पंतप्रधानांशी जोडत आंबेडकरांनी केंद्र सरकारच्या नैतिकतेवरच घाला घातला आहे.
प्रकाश आंबेडकरांचे आरोप हे राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरते मर्यादित नाहीत. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाशी जोडलेले आहेत. एकीकडे इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी लाटायचा आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील पाणी आणि सह्याद्रीचे डोंगर परदेशी डेटा सेंटर्स आणि बड्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी विकायचे, हा विकास आहे की विनाश? अमेरिकेने नाकारलेली डेटा सेंटर्स महाराष्ट्राच्या माथी मारून कोणती प्रगती साधली जात आहे? यावर आता महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः भाजप काय उत्तर देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे….








