Sunetra Pawar | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. तसेच अजित पवारांच्या निधनाला एक महिना उलटून गेला आहे. तर एकिकडे अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत अनेक संशय निर्माण केले जात आहेत. अजित पवारांचा अपघात (Ajit Pawar Plane Crash) आहे की घातपात आहे? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे, अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या नावाने अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यासंदर्भात आता अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी एक पत्र लिहिले असून याबाबत राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
आता अजित पवारांच्या नावाने कोणतेही नवीन उपक्रम राबवण्याआधी पवार कुटुंबियांची अधिकृत लेखी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत धर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सुनेत्रा पवारांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून एक पत्र देण्यात आले आहे. त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी राज्याच्या धर्मादाय आयुक्तांना हे अधिकृत पत्र दिले आहे. या पत्रामध्ये काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अजित पवारांच्या आठवणी जपण्याच्या उद्देशाने त्यांच्या नावाने नवीन कोणती संस्था स्थापन करणे, त्यांचे कोणत्याही ठिकाणी स्मारक उभारणे किंवा त्यांच्या नावाने कोणताही उपक्रम राबवताना आता पवार कुटुंबियांनी लेखी परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे आ पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
अजित पवारांच्या नावाचा वापर करण्याआधी परवानगी घ्यावी लागणार
सुनेत्रा पवारांकडून देण्यात आलेल्या या पत्राची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी पुढची कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. धर्मादाय आयुक्तांनी राज्यातील सर्व सार्वजनिक संस्थांना आणि कार्यालयांना यासंदर्भातले स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच पवार कुटुंबीयांचे हे सर्व निर्देश सार्वजनिक संस्थांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर ठळकपणे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही संस्थेला किंवा कोणत्याही कार्यक्रमात अजित दादांच्या नावाचा वापर करायचा असेल तर आधी पवार कुटुंबियांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
अजित पवारांच्या कार्याचा वारसा जपताना त्यामध्ये पारदर्शकता राहावी तसेच त्यांच्या नावाचा आदर राखला जावा, असा या पवार कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अजित पवार यांचा 28 फेब्रुवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणी जपण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने नवीन उपक्रम, कार्यक्रम राबवले जात आहेत. तसेच अनेक ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. यापार्श्वभूमीवर अजित दादांच्या नावाचा कोणताही गैरवापर होऊ नये म्हणून पवार कुटुंबियाने मोठे पाऊल उचलले आहे.












