Sunetra Pawar Emotional Post : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २७ वा वर्धापन दिन आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन असून सर्वांचेच डोळे दादांच्या आठवणीने भरून आले आहेत. जानेवारी महिन्यात बारामतीजवळ विमान अपघातात अजित पवार यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या जाण्याने अख्ख्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला, पवार कुटुंबातील व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू तर कित्येक दिवस विसावत नव्हते. आज पुन्हा या वर्धापनदिनी दादांच्या आठवणींनी संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अश्रूमय झाला आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे.
शिवसेना फुटली 2 गट झाले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी फूट पडली दोन गट झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाने भाजपची साथ दिली. तर शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षाने विरोधी बाकावर बसण्याचे पसंत केलं. दादांचा हा पक्ष महायुतीत सहभागी झाला. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादीने स्वतंत्र वर्धापन दिन साजरे करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पहिलाच वर्धापन दिन असून याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याराष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी X वर एक पोस्ट लिहीली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया, असं आवाहन त्यांनी या पोस्टद्वारे केलं आहे.
सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट…
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे, अस त्यांनी लिहीलं. पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत…
दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते
त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता, असंही सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.
विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी वाटेवर चालून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा ! असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं.












