Deool Band 2 Box Office: मराठी चित्रपट देऊळ बंद २ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून त्याने कमाईचे नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने वेडला मागे टाकत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ‘देऊळ बंद २ ची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही त्याने दमदार कामगिरी केली आहे. सामाजिक आशय, रहस्य आणि मनोरंजनाचा मिलाफ असलेल्या या चित्रपटाने अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची कमाई करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
हेही वाचा: ठाण्यात परप्रांतीय चालकाकडून वृद्धाला मारहाण; राज ठाकरेंनी फोनवरून केली विचारपूस
प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शनाच्या २० व्या दिवशीही चांगली कमाई कायम राखली. २० व्या दिवशी चित्रपटाने सुमारे १.१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे एकूण नेट कलेक्शन ६२ कोटी रुपयांवर पोहोचले असून ग्रॉस कमाई ७३ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. आगामी काही दिवसांतहा चित्रपट ७५ कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम राहिल्याने २२ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय झाला. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची पकड मजबूत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
‘देऊळ बंद २’ ने कमाईच्या बाबतीत अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने वेड च्या कमाईलाही मागे टाकत मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे.
सामाजिक विषयावर भाष्य करतानाच मनोरंजनाचा समतोल साधण्यात चित्रपट यशस्वी ठरल्याचे मत प्रेक्षक आणि समीक्षकांकडून व्यक्त केले जात आहे. कलाकारांचा अभिनय, कथानकाची मांडणी आणि दिग्दर्शन या सर्व बाबींना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ‘देऊळ बंद 2’ 2026 मधील सर्वाधिक यशस्वी मराठी चित्रपटांपैकी एक ठरताना दिसत आहे.











