Breaking News :
  • Home
  • Top News
  • नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलय! गावं, रस्ते आणि पूल वाहून गेले; मोठ्या जीवितहानीची भीती
देश

नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलय! गावं, रस्ते आणि पूल वाहून गेले; मोठ्या जीवितहानीची भीती

Nepal Tibet Border Flood
3
Nepal Tibet Border Flood: नेपाळ- तिबेट सीमेवरील रासुवा परिसरात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे हाहाकार उडाला आहे. भोटे कोशी नदीच्या पुराच्या तडाख्यात गावं, रस्ते आणि पूल बाधित झाले असून अनेक जण बेपत्ता असल्याने मोठ्या जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे.

हिमालयीन भागात निसर्गाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात (Nepal Tibet Border Flood) बुधवारी अचानक आलेल्या भीषण पुरामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला. रासुवा जिल्ह्यातील भोटे कोषशी नदीच्या परिसराला पुराचा सार्वधिक फटका बसला असून घरं, रस्ते, पूल आणि वीज प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत.

हेही वाचा: ‘राहुल गांधींनी मोदींना मागे टाकलंय’; संजय राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, नेमकं काय म्हणाले?

पुराच्या तडाख्याने संपूर्ण वस्त्या उद्ध्वस्त

भोटे कोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. पुराच्या वेगवान प्रवाहासोबत चिखल आणि मोठ्या प्रमाणात ढिगारा वाहून आल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी संपूर्ण वस्त्याच पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

रासुवामधील स्याफ्रुबेसी आणि तिमुरे परिसरात परिस्थिती गंभीर आहे. अनेक रस्ते आणि पूल वाहून गेल्याने प्रभावित भागाशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. पुरामुळे चीन – नेपाळ सीमेवरील महत्वाच्या मार्गावरही परिणाम झाला असून वाहतूक आणि दळणवळण विस्कळीत झाले आहे.

बचावकार्याला अडथळे

नेपाळी लष्कर, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, पुराचे पाणी ओसरलेले नसल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. खराब परिस्थितीमुळे हेलिकॉप्टरनाही प्रभावित भागात उतरण्यात अडचणी येत आहेत.

नदीकाठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुढील काळात आणखी पूर किंवा भूस्खलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वीज आणि पायाभूत सुविधांनाही मोठा फटका

या आपत्तीचा परिणाम केवळ नागरिकांच्या जीवनावरच नाही, तर नेपाळच्या ऊर्जा व्यवस्थेवरही झाला आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या माहितीनुसार सुमारे ४३० मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेवर परिणाम झाला आहे. रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

पुरामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हिमालयीन भागातील अशा घटनांमध्ये हिमनदीतील पाणी, भूस्खलन किंवा अचानक नदीप्रवाह वाढणे यांसारख्या कारणांची शक्यता तपासली जात आहे. गेल्या वर्षीही याच भोटे कोशी नदी परिसरात भीषण पूर आला होता.

सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष बेपत्ता नागरिकांचा शोध घेणे, अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि प्रभावित भागात मदत पोहोचवण्यावर आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दोन्ही देशांकडून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts