Nepal Flood 2026 : जेव्हा निसर्गाचा संयम सुटतो, तेव्हा जगातील सर्वात मोठे पर्वतही पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतात… तुमच्या स्क्रीनवर दिसणारी ही दृश्ये कोणत्याही हॉलिवूडपटातल्या व्हीएफएक्सची नाहीत. हा हिमालयाचा तो जिवंत संताप आहे, ज्याने अवघ्या शेजारील देश नेपाळला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून उभे केले आहे… डोळ्यांदेखत अख्खे डोंगर नद्यांमध्ये दफन होत आहेत, हसती-खेळती गावे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली जात आहेत आणि माणसांचे संसार पाण्याचा एक प्रवाह एका झटक्यात गिळून टाकत आहे, नेपाळवर निसर्गाने आतापर्यंतचा सर्वात मोठा आस्मानी सर्जिकल स्ट्राईक केला आहे…
पण हा फक्त पावसाचा पूर नाही. हे हिमालयाच्या अस्तित्वावर आलेले संकट आहे. बंगालच्या उपसागरातून उठलेल्या एका वादळाने अवघ्या 96 तासांत नेपाळचा भूगोल बदलून टाकला आहे. काय घडतंय नेपाळमध्ये? किती निष्पापांचा बळी गेलाय? आणि हिमालयाची ही शांतता विनाशाचा कोणता नवा अध्याय लिहिते आहे? पाहूयात याचवरचा हा स्पेशल report…हिमालयाचा महाप्रलय, नेपाळवर आस्मानी संकट…
Baglungमध्ये भूस्खलनाने घरं गाडली; अनेकांचा मृत्यू
२४ ते २९ सप्टेंबर २०२६… हे चार दिवस नेपाळच्या इतिहासात काळ्या अक्षराने लिहिले जातील. नॅशनल डिषास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट अथॉरिटीच्या ताज्या आणि अधिकृत रिपोर्टनुसार, या नव्या वादळी पावसामुळे २४ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. पण ग्राउंड झिरोवरून येणारी माहिती यापेक्षा भयानक आहे. डोंगर कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली किती मृतदेह दबले गेले आहेत, याचा अचूक आकडा अद्याप कोणाकडेच नाही. एकट्या बाग्लुंग जिल्ह्यात १० लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका गावात डोंगर कोसळला आणि एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या तीन निष्पाप मुलांचा घरासह चिखलात दफन होऊन अंत झाला. याशिवाय ५ ते ११ जण अद्याप अधिकृतपणे बेपत्ता आहेत. २६० हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून २४७ हून अधिक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. संपूर्ण नेपाळमध्ये २६ हून अधिक लोक गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहेत.
पण संकट इथेच संपत नाही. सर्वात धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी येतेय उत्तर नेपाळमधून. जगातील सर्वात धोकादायक पर्वतांपैकी एक असलेल्या हिमलुंग हिमाल पर्वताच्या बेस कॅम्पवर एकाएकी भीषण बर्फाचे वादळ म्हणजेच Avalanche आले आहे… तिथे विदेशी पर्यटकांसाठी कॅम्पिंगचे काम करणारे १२ स्थानिक मजूर एका झटक्यात त्या पांढऱ्या मृत्यूखाली गाडले गेले आहेत आणि अद्याप बेपत्ता आहेत, ७ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर उणे तापमानात लष्कराचे हेलिकॉप्टर्स जीवाची बाजी लावून शोधमोहीम राबवत आहेत, पण खराब हवामानामुळे निसर्ग त्यांनाही रोखत आहे.
हेही वाचा : AI मुळे 1अब्ज लोकांचे जीव जाणार? बिल गेट्स यांचा धक्कादायक इशारा
Kali Gandaki नदीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान ( Nepal Flood 2026 )
नेपाळमधील भूगोलाचा अभ्यास केला तर समजेल की, येथील नद्याच आता या देशासाठी मृत्यूचा सापळा बनल्या आहेत. मुस्तांग आणि मनांग जिल्ह्यात डोंगरांचे जे महाकाय कडे कोसळले, ते थेट जाऊन काळी गंडकी नदीच्या पात्रात पडले. लाखो टन चिखल, दगड आणि माती एकाच वेळी नदीत पडल्यामुळे नदीचे पात्र ब्लॉक झाले आणि पाण्याचा स्तर अचानक त्सुनामीसारखा वाढला. या काळी गंडकी नदीने अवघ्या काही तासांत ६६ हून अधिक घरे आणि अनेक पूल गिळंकृत केले आहेत.
नेपाळची लाईफलाईन मानले जाणारे पृथ्वी हायवे आणि सिद्धार्थ हायवे शेकडो ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. हजारो पर्यटक आणि स्थानिक लोक अन्न-पाण्याविना रस्त्यांवर अडकले आहेत. नेपाळच्या ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि डोंगरांच्या कोसळण्यामुळे एका ४० मेगावॅटच्या हायड्रोपॉवर प्रोजेक्टचे ट्रान्समिशन टॉवर्स वाहून गेले आहेत. परिणामी, मनांग, मुस्तांग, मायगडी आणि बाग्लुंग हे चार मोठे जिल्हे संपूर्णपणे अंधारात बुडाले आहेत. तिथे ना मोबाईल नेटवर्क आहे, ना वीज, ना पिण्याचे शुद्ध पाणी….
आता सर्वात मोठा प्रश्न… निसर्गाने नेपाळलाच का टार्गेट केले? हा प्रकोप का आला? याचे तात्कालिक शास्त्रीय कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेली तीव्र कमी दाबाची पट्ट्याची प्रणाली. यामुळे ढगफुटी झाली. एकाच स्टेशनवर तब्बल २१ इंच पावसाची नोंद झाली आहे, ज्याने डोंगराची माती पूर्णपणे भुसभुशीत केली. पण शास्त्रज्ञांच्या मते, हा फक्त निसर्गाचा खेळ नाही, हा माणसाने निसर्गाशी केलेला खेळ आहे..
नेपाळमध्ये एवढा मोठा प्रकोप का झाला? ( Himlung Himal )
हिमालय हा जगातील सर्वात तरुण पर्वत आहे. याची माती अजूनही कच्ची आहे आणि खडक ठिसूळ आहेत. पण गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली नेपाळच्या या कच्च्या डोंगरांच्या छातीवर डायनामाईट लावून सुरुंग पेरले गेले. अनियोजित रस्ते, नद्यांचे प्रवाह अडवून बांधलेले सिमेंटचे महाकाय प्रकल्प आणि डोंगर पोखरून काढणाऱ्या मशीन्स… या मानवी लोभाने हिमालयाचा पायाच कमकुवत केला आहे. हा निसर्गाचा कोप नाही, हा निसर्गाचा मानवाविरुद्धचा कायदेशीर खटला आहे, ज्याचा निकाल आता मृत्यूच्या रूपाने समोर येतोय… नेपाळ या धक्क्यातून सावरत नव्हता, कारण अवघ्या एक महिन्यापूर्वी, म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेवर हिमनदी कोसळल्यामुळे आलेल्या महापुरात तब्बल १,४५० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता आणि ५,००० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत… त्या विनाशाची जखम अद्याप ओली असतानाच, निसर्गाने पुन्हा एकदा नेपाळला धोक्याचा सर्वात मोठा इशारा दिला आहे.
सध्या नेपाळचे लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि स्थानिक बचाव पथके रात्रीचा दिवस करून चिखलातून जिंदगी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत १,२०० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. पण निसर्गापुढे माणसाचे हात हताश झाले आहेत. नेपाळमधील हा महाप्रलय पाहिल्यानंतर एक गोष्ट मनावर कोरून ठेवा… विज्ञानाचा कितीही माज असला, अब्जावधी रुपयांचा विकास असला, तरी निसर्गाच्या एका झटक्यासमोर मानवाची औकात शून्य आहे… विकासाची आंधळी शर्यत जेव्हा निसर्गाच्या मर्यादेची लक्ष्मणरेषा ओलांडते, तेव्हा हिमालयासारखे बलाढ्य पर्वतही स्वतःच्याच लेकरांची थडगी बनून अंगावर कोसळतात….
नेपाळमधील या भीषण दुर्घटनेत ज्या निष्पापांनी आपले प्राण गमावले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली….







