Satyam Yog Foundation | सूरतमधून (Surat) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सूरतमध्ये बनावट नोटा (Fake Notes) चालवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 2 कोटींहून अधिक बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच 6 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा काळा कारनामा एका आध्यात्मिक आश्रमातून उघड झाला आहे.
हेही वाचा – अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; फार्महाऊसवर शस्त्र अन् SIT ची मोठी कारवाई
श्री सत्यम योग फाऊंडेशन आश्रमामध्ये बनावट नोटा छापण्याचा काळा कारनामा उघड
मिळालेल्या माहितीनुसार, सूरत येथील कामरेज तालुक्यात श्री सत्यम योग फाऊंडेशन आश्रमामध्ये बनावट नोटा छापण्याचा काळा कारनामा सुरू होता. सर्वांना बाहेरून धर्म आणि योगाचे केंद्र वाटत होते त्याच आश्रमात आतमध्ये काळा कारनामा केला जात होता. त्यामुळे सूरतमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
श्री सत्यम योग फाऊंडेशन आश्रमामध्ये बनावट नोटा छापण्याच्या करानाम्याबाबत क्राइम ब्रांचला गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत एका महिलेसह 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. सूरतवरून अहमदाबादला बनावट नोटांची वाहतूक केली जाणार होती. तर पोलिसांनी 500 रूपये किंमतीच्या 40 हजारांहून अधिक बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तसेच याची एकूण किंमत 2 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.
क्राइम ब्रांचनी सापळा रचत आरोपींना घेतले ताब्यात
या आश्रमात क्राइम ब्रांचच्या पथकानं छापा टाकत तेथील प्रिंटिंग मशीन, कॉम्प्युटर, रंग, विशेष कागदे आणि महत्त्वाची काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच या नेटवर्कमध्ये आश्रमाच्या काही वाहनांचा देखील वापर करण्यात आला होती, ती वाहने देखील क्राइम ब्रांचने जप्त केली आहेत.
बनावट नोटा छापण्याचा हा प्रकार सुरतच्या पराछा परिसरात करण्यात आला होता. तसेच या नोटा चलनात आणण्यासाठी एक विशिष्ट योजना आखण्यात आली होती. तसेच 500 रूपयांच्या खऱ्या नोटा द्या आणि 1500 बनावट नोटा घ्या अशी स्कीम आरोपींची होती, असे क्राइम ब्रांचच्या तपासात उघड झाले आहे. क्राइम ब्रांचनी सापळा रचत या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
बनावट नोटा छापण्याचा हा प्रकार आता उघडकीस आला असून सूरतमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करणारा प्रकार सूरतमध्ये सुरू होता. मात्र, क्राइम ब्रांचने सतर्कता दाखवत या काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश केला आहे.






