• Home
  • राजकारण
  • अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; फार्महाऊसवर शस्त्र अन् SIT ची मोठी कारवाई
Top News

अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; फार्महाऊसवर शस्त्र अन् SIT ची मोठी कारवाई

ashok kharat 1

Ashok Kharat Case | नाशिकमध्ये (Nashik) काल (18 मार्च) एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे, ज्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ज्योतिषी अशोक खरातचा (Ashok Kharat) खरा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे. बड्या राजकीय नेत्यांचे, उद्योगपतींचे आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणून अशोक खरातची ओळख होती. तर आता त्याचा काळा कारनामा उघड झाला आहे.

हेही वाचा  – ‘डोरेमॉन’मागचा मास्टरमाइंड काळाच्या पडद्याआड; दिग्दर्शक त्सुतोमू शिबायामा यांचं निधन, अॅनिमेशन विश्वाला मोठा धक्का

ज्योतिषी अशोक खरातला एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार करत बलात्कार केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेने नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरूद्ध तक्रार दाखल केली होता. पीडितेच्या तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी सापळा रचून बुधवारी (18 मार्च) अशोक खरातला आपल्या ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या. पहाटे 3 वाजता पोलिसांनी त्याला अटक केली.

खरातच्या फार्महाऊसवर छापा टाकल्यानंतर पोलिसांच्या हाती काय लागलं?

पोलिसांनी अशोक खरातला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी अशोक खरातकडे असलेला एक पेनड्राईव्ह देखील जप्त केला आहे. या पेनड्राईव्हमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. हे व्हिडीओ नेमके कोणाचे आहेत आणि अशोक खरात या व्हिडीओंचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करत होता का? याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच पोलिसांनी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील अशोक खरातच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता, ज्यात पोलिसांच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहे. ही कागदपत्रे मालमत्ता आणि व्यवहारांशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पोलिसांना खरातच्या फार्महाऊसवर एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे आढळली असून पोलिसांनी ती जप्त केली आहेत.

अशोक खरात प्रकरणाची चौकशी SIT करणार

आता अशोक खरात प्रकरणाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे. वरिष्ठ अधिकारी तेजस्वीनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे तपास पथक काम करणार आहे. त्यामुळे आता SIT च्या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आरोपी अशोक खरातच्या संपर्कात अनेक बडे राजकीय नेते, उद्योजग होते. यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भविष्य सांगितलं होतं. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या ‘श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’चा खरात अध्यक्ष आहे. तर एकनाथ शिंदेंनी नोव्हेंबर 2022 मध्ये त्याच्या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांने शिंदेंचं भविष्य सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts