AC Side Effect | सध्या कडक उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू आहेत. वाढत्या उष्णतेमुळे बरेच लोक सतत एसी चालू करून बसतात. तर काहीजण बाहेरून घरात आलं की, झोपताना, काम करताना एसी (AC) लावून बसतात. एसीच्या थंड हवेमुळे शरीराला गार वाटतं त्यामुळे एसीची हवा प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. त्यामुळे घरात, ऑफिसमध्ये आणि कारमध्ये सुद्धा लोक एसीचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात.पण तुम्हाला माहितीये का की हीच एसीची हवा जेवढी शरीराला गार वाटते तेवढीच शरीरासाठी धोकादायक आहे.
एसीमुळे शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात?
एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यामुळे अनेक गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता असते. सतत एसीमध्ये बसल्यामुळे ‘सिक बिल्डिंग सिंड्रोम’चा धोका वाढू शकतो, असं तज्ञ सांगतात. तर एसीमुळे अनेक दुष्परिणाम शरीरावर होत असतात. हे दुष्परिणाम कोणते? याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.
सतत एसीमध्ये बसल्यामुळे अनेकांना डोकेदुखी, सर्दी, त्वचा कोरडी पडणे असे त्रास जाणवताना दिसतात. तर काहींना एसीमुळे सायनसचा त्रास निर्माण होतो, श्वास घेण्यास अडचण निर्माण होते.
बऱ्याच जणांचं एसीमुळे डोकं जड होत असतं. एसीमुळे खोलीतील आद्रता कमी होते आणि हवा कोरडी होते. ही कोरडी हवा आपल्या शरीरातील ओलावा खेचून घेते यामुळे शरीरातील पाणी कमी होते. तसेच मेंदूकडे जाणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रवाहातही बदल होतो. त्यामुळ डोकं जड होण्यास सुरूवात होते आणि डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.
सतत एसीमध्ये बसल्यामुळे एसीची थंड हवा, कोरडी हवा आपल्या नाक आणि घशात जाते. त्यामुळे नाकातील आणि घशातील म्यूकस मेब्रेंन कोरडी होते आणि सायनसचा त्रास निर्माण होतो.
एसीमध्ये कोरडी हवा असते जी आपली त्वचा कोरडी करते. एसीमुळे आपल्या शरीरातील ओलावा कमी होतो आणि आपली स्कीन ड्राय होण्यास सुरूवात होते. त्यामुळे त्वचेवर खाज येणे, त्वचा लाल पडणे, त्वचा कोरडी पडणे अशा समस्या निर्माण होताना दिसतात.
एसीच्या थंड वाऱ्यामुळे स्नायूंमध्ये ताण येण्याची शक्यता असते. तसेच एसीची कोरडी हवा आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचित करते ज्यामुळे आपल्या मेंदूवर ताण येतो. असे अनेक गंभीर आजार एसीच्या थंड हवेमुळे निर्माण होत असतात.
एसीमध्ये तुम्हीही दररोज बसत असाल तर स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे, नाहीतर गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही दररोज एसीमध्ये बसत असाल तर नियमित पाणी प्या. सलग जास्त वेळ एसीत बसणं टाळा आणि थोडं बाहेर जाऊन ताजी हवा घ्या. तसेच एसीचे तापमान खूप कमी ठेवू नका.











