Tehsildar Rakesh Gidde Accident | बीड (Beed) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे (Rakesh Gidde) यांचं कार अपघातात (Car Accident) निधन झालं आहे. आज (9 एप्रिल) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ राकेश गिड्डे यांच्या कारचा भीषण अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्याने गिड्डे यांचा मोठा अपघात झाला. या अपघातात राकेश गिड्डे यांचं दुर्दैवी निधन झालं आहे.
हेही वाचा – बारामतीत मोठा राजकीय ट्विस्ट! काँग्रेस उमेदवाराने घेतली शरद पवारांची भेट, आत काय ठरलं?
तहसीलदार राकेश गिड्डे यांचा भीषण अपघात
समोर आलेल्या माहितीनुसार, राकेड गिड्डे हे स्वत:च्या कारने प्रवास करत होते. तर पहाटेच्या वेळी गाडी वेगात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की राकेश गिड्डे यांनी जागीच आपले प्राण गमावले. हा अपघात होताच तेथील स्थानिक नागरिकांनी तातडीनं धाव घेतली. मात्र, तोपर्यंत राकेश गिड्डे यांचा मृत्यू झाला होता.
राकेश गिड्डे यांनी तहसील कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक धोरणात्मक निर्णय घेतले होते. तसेच त्यांनी अनेक कामे मार्गी देखील लावली होती. तर आता तरूण महसूल अधिकारी राकेश गिड्डे यांचं निधन झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. तर पोलिसांनी राकेश गिड्डे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूरमधील ग्रामीण रूग्णालयात पाठवला आहे. तर सध्या राकेश गिड्डे यांच्या अपघाताचा पोलीस अधित तपास करत आहेत. या अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.












