Mythos AI Bank Fraud Warning : जागतिक अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाचे वारे वाहत असतानाच आता ‘क्लाउड मिथोस’ या नावाच्या एका महाकाय AI मॉडेलने भारत आणि जपानच्या आर्थिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अँथ्रोपिक या कंपनीने विकसित केलेले हे ‘फ्रंटियर’ AI मॉडेल इतके शक्तिशाली आहे की, त्याला “डिजिटल मास्टर की” म्हटले जात आहे. गुरुवारी नवी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तातडीची बैठक घेऊन भारतीय बँकांना हाय-अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाच – Gold-Silver प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लग्नसराईत दर घसरले; आजचे ताजे भाव जाणून घ्या
सामान्य लोकांसाठी उपलब्ध करण्यास नकार
आता या नव्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या खात्यांना नेमका धोका काय आहे? हेही डिटेलमध्ये समजून घेऊया.. क्लाउड मिथोस’ हे सामान्य चॅटबॉटसारखे नसून ते सायबर सुरक्षेतील सर्वात कठीण पेच सोडवण्यासाठी बनवले गेले आहे. मात्र, त्याची हीच ताकद आता चिंतेचा विषय ठरली आहे. ‘क्लाउड मिथोस’ची निर्मिती अमेरिकेतील ‘अँथ्रोपिक’ या कंपनीने केली आहे. आपण दैनंदिन वापरात पाहतो त्या AI पेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहे. हे मॉडेल कोडिंग आणि सायबर सुरक्षेतील अशा जटिल कामांसाठी बनवले गेले आहे, जे मानवी मेंदूला अशक्य वाटतात. याची शक्ती पाहूनच याच्या निर्मात्यांनी याला सामान्य लोकांसाठी उपलब्ध करण्यास नकार दिला होता. त्यांच्या मते, हे AI म्हणजे सॉफ्टवेअरमधील लपलेल्या त्रुटी क्षणात शोधणारी एक ‘डिजिटल मास्टर की’ आहे.
आश्चर्यकारक परंतू तेवढेच चिंताजनक उलगडे
क्लाउड मिथोसची चाचणी घेण्यात आली तेव्हा काही आश्चर्यकारक परंतू तेवढेच चिंताजनक उलगडे झाले. या चाचणीत या एआय मॉडेलने सॉफ्टवेअरमधील तब्बल २७ वर्षापूर्वीची त्रुटी काही सेकंदात शोधून काढली. विशेष म्हणजेच ही त्रुटी मूळ सॉफ्टवेअर विकासकालाही माहित नव्हती. भारत आणि जपानमधील अनेक जुन्या बँकिंग प्रणाली अजूनही जुन्या सॉफ्टवेअरवर चालतात. या यंत्रणा आधुनिक AI हल्ल्यांपुढे टिकू शकणार नाहीत, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
खरं तर क्लाउड मिथोस बनवणाऱ्या अँथ्रोपिकने हे मॉडेल अद्याप तरी सार्वजनिक केले नसले तरी ‘प्रोजेक्ट ग्लासविंग’ अंतर्गत काही मोजक्या संस्थांना ते देण्यात आले आहे. या संस्था सुरक्षित मानले जात असल्याचा दावा आहे. मात्र, अलीकडेच काही अनधिकृत गटांनी या मॉडेलचा ताबा मिळवल्याच्या बातम्यांनीही या प्रकरणाबाबत चिंतेत भर घातली आहे.
अर्थमंत्री सीतारामन यांच्या बँकांना सावध राहण्यच्या सूचना
दिल्लीत २३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, सध्या भारतीय बँकिंग व्यवस्था सुरक्षित असली तरी, “जुने सुरक्षा नियम” आता पुरेसे नाहीत. यासाठी सीतारामन यांनी इंडियन बॅंक्स असोसिएशन आणि सरकारी एजन्सी ‘CERT-In’ या दोन्हींचे समन्वय साधत रिअल टाइम माहिती शेअरिंग यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत. ही यंत्रणा कोणत्याही संभाव्य हल्याला मानवी प्रतिसादापेक्षा वेगाने थोपवण्यात सज्ज असेल. तिकडे जपाननेही बँकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन केला आहे.







