Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • मस्साजोग पोटनिवडणूक निकाल जाहीर; स्वरूपानंद देशमुख विजयी, अश्विनी देशमुखांचा 92 मतांनी पराभव
Top News

मस्साजोग पोटनिवडणूक निकाल जाहीर; स्वरूपानंद देशमुख विजयी, अश्विनी देशमुखांचा 92 मतांनी पराभव

beed massajog election
79

Beed Massajog Gram Panchayat By-Election Result: बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत निकाल जाहीर झाला असून स्वरूपानंद देशमुख यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला.

ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरली होती. गावातील राजकीय प्रतिष्ठा आणि वर्चस्वासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. अखेर ग्रामस्थांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल दिला. निकालानंतर समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करत गावात गुलालाची उधळण केली. या विजयामुळे मस्साजोगच्या स्थानिक राजकारणात नवीन घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे.

हत्येच्या पार्श्वभूमीवर पार पडलेली निवडणूक

मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या झाली होती. या घटनेनंतर सरपंचपद रिक्त झाले आहे. त्यांच्या निधनामुळे गावात निर्माण झालेली पोकळी आणि अपूर्ण राहिलेली विकासकामे लक्षात घेऊन ही निवणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाकडून तसेच देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आली होती.

हेही वाचा: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपकडून ५ उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली संधी, कोणाचा पत्ता कट?

यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांना बिनविरोध निवडून देऊन संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करावी, अशी भावना व्यक्त केली जात होती.

मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता प्रत्यक्ष मतदानाने पार पडली.

यंदा 84 टक्के मतदानाची नोंद

दरम्यान, 7 एप्रिल 2026 पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. जिल्ह्यातील एकूण 88 रिक्त पदांसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

मस्साजोगमध्ये एकूण 2,284 मतदार असून यंदा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. या निवडणुकीत 84 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत सुमारे 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सकाळच्या वेळेत मतदानाचा वेग तुलनेने कमी होता, मात्र दुपारनंतर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर हजेरी लावली, त्यामुळे मतदानात वाढ झाली.

मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, निकालानंतर गावात काही प्रमाणात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts