Vidhan Parishad Election: महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देत धक्कातंत्र वापरले असून, अनेक विद्यमान आमदारांना वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला ६ जागा येणार असल्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नव्हती.
दरम्यान, भाजप (Bharatiya Janata Party) ने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाने मोठे बदल करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे, विद्यमान आमदारांपैकी काहींना या वेळी वगळण्यात आले आहे.
कोण आहेत पाच उमेदवार
जाहीर झालेल्या यादीत विवेक कोल्हे, संजय भेंडे, माधवी नाईक, प्रमोद जठार, प्रज्ञा सातव आणि सुनील कर्जतकर यांचा समावेश आहे.
भाजपच्या कोअर कमिटीने याआधी सुमारे ३० इच्छुकांची यादी तयार करून ती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवली होती. मात्र, केंद्राकडून काही नावे कमी करून सुधारित यादी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर अंतिम यादीत मोठे बदल करण्यात आले.
या निवडणुकीत एकूण ९ नियमित जागांसाठी आणि १ पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
दरम्यान, उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली होती. अनेक इच्छुकांनी जोरदार लॉबिंग केल्याची चर्चा होती. त्यामुळे अंतिम यादीत नाव न आल्यास नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
विवेक कोल्हे कोण आहे?
अहिल्यानगर जिल्ह्यातील विवेक कोल्हे यांना प्रथमच विधानपरिषदेत संधी देण्यात आली आहे. कोल्हे कुटुंबाचे स्थानिक राजकारणात मोठे वर्चस्व मानले जाते. ते ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहेत. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली होती.
नागपूरचे संजय भेंडे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असून त्यांनी संघटनात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांच्या निवडणूक व्यवस्थापनातही सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या दीर्घकालीन कामाचा गौरव म्हणून पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याचे मानले जात आहे.
माधवी नाईक आणि प्रमोद जठार यांनाही पक्षाने संधी देत संघटनात्मक आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः कोकण भागातील प्रतिनिधित्व वाढवण्यावर भाजपने भर दिला असल्याचे दिसून येते.
एकूणच, विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने विविध प्रदेश आणि गटांना प्रतिनिधित्व देत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. या घोषणेनंतर राज्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.












