Buldhana Shivaji Kon Hota Book Issue: बुलढाणा जिल्ह्यात एका पुस्तकाभोवती निर्माण झालेल्या वादामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजी कोण होता? या पुस्तकाशी संबंधित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकाशकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात
कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना मंगळवारी बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर जाऊन पुस्तकाचे वाचन करणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत आंबी हे बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करताच पोलिसांनी त्यांना रोखून ताब्यात घेतले. सध्या त्यांना अज्ञात ठिकाणी ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वीच्या वादाशी जोडली जात आहे. आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेत वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर या घटनेचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांकडून आंदोलन आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मोर्चा काढण्याचे नियोजन
रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्याचे नियोजन होते. तसेच आमदार गायकवाड यांच्या घरासमोर सार्वजनिक पुस्तक वाचनाचा कार्यक्रमही प्रस्तावित होता. या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने बुलढाण्यात दाखल झाले होते.
दरम्यान, शेतकरी नेते अजित नवले यांनी पोलिस कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप काढून टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.












