Tukaram Mundhe: बुलढाण्यातील खामगाव परिसरातील भेसळीच्या मुद्द्यावर ७५ वर्षीय निर्मलाबाई हेलोडे यांनी तुकाराम मुंढेंना थेट आवाहन केलं आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या धडाकेबाज कारवाईची राज्यभर चर्चा सुरू आहे. भेसळ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याने त्यांचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे. अशातच खामगावमधील ७५ वर्षीय निर्मलाबाई हेलोडे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मुंढे यांना थेट बुलढाणा जिल्ह्यात येण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप ५ हेडलाईन्स
खामगावमध्ये (Khamgaon) येऊन परिस्थिती पाहा
निर्मलाबाई हेलोडे (Nirmalabai Helode) यांनी आपल्या व्हिडीओमध्ये खामगाव परिसरातील खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचा आरोप केला आहे. खाद्यतेल, फळे आणि भाजीपाल्याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. स्थानिक पातळीवर संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा दावा करत त्यांनी तुकाराम मुंढे यांनी स्वतः खामगावला भेट द्यावी, अशी मागणी केली.
आजींच्या व्हिडीओतील थेट आणि रोखठोक भाषेमुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. “तुम्ही इकडे या आणि परिस्थिती स्वतः पाहा,” असा संदेश त्यांनी मुंढेंना दिला आहे.
View this post on Instagram
भेसळीच्या मुद्द्यावर नागरिकांची चिंता
बुलढाणा (Buldhana news) जिल्ह्यातील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे या व्हिडीओतून अधोरेखित होते. मात्र, आजींनी केलेले आरोप हे त्यांच्या वैयक्तिक दाव्यांवर आधारित असून संबंधित प्रशासनाकडून त्याची स्वतंत्र पुष्टी होणे आवश्यक आहे.
मुंढेंच्या कारवाईकडे लक्ष (Tukaram Mundhe news)
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यातील विविध खाद्य व्यवसायांवर तपासणी आणि कारवाई सुरू आहे. मुंबईतील काही डॉमिनोज पिझ्झा आउटलेट्सवर झालेल्या कारवाईत अन्न सुरक्षा, स्वच्छता, पाणी आणि साठवणुकीशी संबंधित त्रुटी आढळल्याची माहिती समोर आली होती. संबंधित आउटलेट्सवरील परवान्यांबाबतही कारवाई करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर आता निर्मलाबाई हेलोडे यांच्या आवाहनाची तुकाराम मुंढे दखल घेणार का आणि खामगाव-बुलढाणा परिसरात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तपासणी केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.







