• Home
  • राजकारण
  • मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी महत्वपूर्ण निर्णय
Top News

मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी महत्वपूर्ण निर्णय

mportant Decisions of the Cabinet Meeting

Cabinet Meeting: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचा विकासासाठी संबंधित असलेल्या अनेक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आदिवासी व उच्च व तंत्र शिक्षण मंडळाबाबत काही महत्वपूर्ण व प्रमुख निर्णय घेण्यात आले.

या संबंधी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यातआलेले निर्णय पुढील प्रमाणे आहेत.

१) आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना

आदिवासी विकास विभागामार्फत स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक स्तरावर (इयत्ता ८वी ते १०वी) तर १९ माध्यमिक आश्रमशाळांना उच्च माध्यमिक (ज्युनिअर कॉलेज) स्तरावर (इयत्ता ११वी व १२वी) उन्नत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी गती मिळणार आहे. यासोबतच आवश्यक पदनिर्मिती आणि त्यासाठी लागणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदींनाही शासनाने मान्यता दिली आहे.

२)  सोलापूरच्या  3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदवीस्तरावरील तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सोलापूर तसेच परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये एआय अँड मशीन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखांचा समावेश असून प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे स्थानिक स्तरावर दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणाची उपलब्धता वाढणार असून विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाण्याची गरज कमी होणार आहे.

३) तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असून यामुळे महाविद्यालयाच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयात अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार असून, परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळणार आहे. तसेच, शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि अध्यापन व्यवस्थेतही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे तुळजापूर आणि आसपासच्या भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे अधिक व्यापकपणे खुली होणार असून, स्थानिक शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts