Nation Wide Emergency : देशभरातील लाखो मोबाईल फोनमध्ये 2 मे रोजी एकाच वेळी मोठा सायरन वाजू शकतो. सरकार देशभरात एका नवीन मोबाईल-आधारित आपत्ती सूचना प्रणालीची चाचणी घेणार आहे. ही मोबाईल आपत्ती संवाद प्रणाली किंवा आपत्कालीन सूचना प्रणाली, दूरसंचार विभागाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या सहकार्यानं विकसित केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना एकाच वेळी सतर्क करणं हा याचा उद्देश आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे २ तास अडकल्या वाहतूक कोंडी;
सेल ब्रॉडकास्ट अलर्ट’ची चाचणी :
दिल्ली-एनसीआर आणि अनेक महानगरांमध्ये या प्रणालीची आधीच चाचणी घेण्यात आली आहे. सरकारनं याला ‘सचेत’ (राष्ट्रीय आपत्ती सूचना पोर्टल) असं नाव दिलं आहे. सरकारनं एसएमएसद्वारे जनतेला आधीच माहिती दिली आहे. एनडीएमएनं पाठवलेल्या संदेशात म्हटलं आहे की, 2 मे 2026 रोजी तुमच्या परिसरात ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट’ची चाचणी घेतली जाईल. तुमच्या मोबाईल फोनवर हा संदेश मिळाल्यावर कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. कृपया घाबरु नका.
फोनवर सायरन वाजल्यास घाबरण्याची गरज नाही :
2 मे रोजी तुमच्या फोनवर सायरन वाजल्यास, घाबरण्याची गरज नाही. भविष्यात आपत्ती आल्यास लोकांना सूचना पाठवण्यासाठी सरकार या सूचना प्रणालीची चाचणी घेणार आहे. दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) संयुक्तपणे ही चाचणी घेत आहेत. यामुळं आपत्तीच्या वेळी लोकांना सतर्क केलं जाईल, दक्षता सुनिश्चित होईल आणि जीवित व मालमत्तेची हानी कमी होईल.
ही प्रणाली कशी काम करते? :
दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांनी विकसित केलेली ही सूचना प्रणाली ‘कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल’ (CAP) वर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघानं शिफारस केलेली ही प्रणाली देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे. आपत्ती-संबंधित सूचना वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे पाठवल्या जातात. लोकांना सतर्क करण्यासाठी फोनवर मोठा सायरन देखील वाजवला जातो. मात्र, ही प्रणाली अशा प्रकारे विकसित केली गेली आहे की, ज्या भागात आपत्ती येण्याची शक्यता आहे, केवळ त्याच भागातील लोकांना सूचना मिळतील. यात सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळं सर्व मोबाईल उपकरणांवर एकाच वेळी रिअल-टाइम सूचना मिळतील याची खात्री होते.






