जयपूर DC Beat RR : इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 43वा साखळी सामना जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना 7 गडी राखून जिंकला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या संघानं निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 225 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष्य 19.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केलं.
हेही वाचा : पालघरचे खासदार हेमंत सावरांच्या कारला अपघात; खासदार थोडक्यात बचावले
रियान परागची शानदार खेळी :
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सामन्याची सुरुवात खराब झाली, त्यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज 12 धावांवर तंबूत परतले. त्यानंतर रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांनी डाव सावरला आणि 59 चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 102 धावांची वेगवान भागीदारी करुन संघाला सामन्यात परत आणलं. जुरेल 42 धावांवर बाद झाला, तर परागनं 90 धावांची शानदार खेळी केली. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या डोनावन फरेरानं अवघ्या 14 चेंडूंमध्ये सहा षटकार आणि दोन चौकारांसह नाबाद 47 धावा केल्या आणि राजस्थानला 220 धावांच्या पुढं नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कनं तीन बळी घेतले, तर काईल जेमिसन, अक्षर पटेल आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
दिल्लीची दमदार सुरुवात :
प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सच्या केएल राहुल आणि पथुम निस्संका या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी करुन भक्कम सुरुवात करून दिली. निस्संका 33 चेंडूंमध्ये 62 धावा करुन बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणा यांनी डावाची गती कायम ठेवत खेळ पुढे नेला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली. नितीश राणा 33 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला, तर केएल राहुलनं 75 धावांची शानदार खेळी केली. 177 धावांवर तीन गडी गमावल्यानंतर, ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सला विजयाकडे नेण्याची जबाबदारी घेतली आणि चौथ्या विकेटसाठी 23 चेंडूंमध्ये 49 धावांची भागीदारी करुन संघाला या सामन्यात विजय मिळवून दिला. स्टब्सनं या सामन्यात 18 धावा केल्या, तर आशुतोषनं 25 धावांची नाबाद खेळी केली. राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.











