तिरुवअनंतपुरम Keralam Assemble Election : केरळ विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणी सुरु झाली आहे. केरळमधून प्राथमिक कलही समोर येत आहेत. दुपारपर्यंत आलेल्या कलांनुसार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (UDF) जोर धरत असल्याचं दिसून येत आहे. यासह स्वातंत्र्यानंतर प्रथमच कोणत्याही राज्यात डाव्यांचे सरकार राहणार नाही. केरळ हे शेवटचे राज्य होते जिथे डावे सत्तेत होते, पण आता ते त्यांच्या हातून निसटत असल्याचं दिसत आहे. यापूर्वी त्रिपुरा आणि बंगालमध्ये डाव्यांचा सफाया झाला होता.
हेही वाचा : आसाममध्ये भाजपा ऐतिहासिक हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर; काँग्रेसची अवस्था मागच्या निवडणुकीपेक्षाही बिकट
केरळमध्ये सत्तांतर निश्चित :
एक्झिट पोलनं राज्यात सत्तांतराची शक्यता आधीच दर्शवली होती आणि सध्याचे कलही त्याच दिशेनं जात असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत UDF नं महागाई, भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि बेरोजगारी यांसारखे मोठे मुद्दे उपस्थित केले. काँग्रेसचे 80 ते 90 जागा जिंकून पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र पक्षांतर्गत नेतृत्वावरून असलेले मतभेद हे एक मोठे अंतर्गत आव्हान आहे.
एलडीएफची ‘विकास आणि कल्याण’वर बाजी :
सुरुवातीचे कल एलडीएफच्या बाजूने दिसत नसले तरी, मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतण्यासाठी प्रयत्नशील होते. एलडीएफचा संपूर्ण निवडणूक प्रचार ‘विकास आणि कल्याण’ या अजेंड्यावर केंद्रित आहे. त्यांनी आपल्या सरकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सामाजिक सुरक्षा योजनांना सरकारची सर्वात मोठी ताकद म्हणून सादर केलं होतं. मात्र, राजकीय तज्ज्ञांच्या मते, काही भागांमधील मतदारांचा थकवा आणि सत्ताविरोधी लाटेमुळे एलडीएफचा मार्ग कठीण झाला आहे.
शेवटचे राज्यही हातातून निसटलं :
हे लक्षात घेण्यासारखं आहे की केरळ व्यतिरिक्त, डाव्यांनी यापूर्वी पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये सरकार स्थापन केले होतं, परंतु दोन्ही ठिकाणी त्यांचा सपशेल पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये, 2011 मध्ये डाव्या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्यात आलं आणि ते पुन्हा कधीही सत्तेत आले नाही. त्रिपुरामध्येही, केरळमधील डावे सरकार कोसळताना दिसत आहे. केरळमध्ये यूडीएफच्या विजयामुळं डावे संपूर्ण देशातून नामशेष होतील. याचा अर्थ असा की देशातील कोणत्याही राज्यात डाव्यांचं सरकार येणार नाही.
पिनारयींचं 12 मंत्री पिछाडीवर :
दरम्यान, केरळमध्ये मतमोजणी सुरु असताना, किमान 12 मंत्री आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. मुख्यमंत्री पिनारयी विजयन हे त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या धर्मदम या सध्याच्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत. वृत्तानुसार, मंत्री वीणा जॉर्ज, एम. बी. राजेश, ओ. आर. केलू, आर. बिंदू, जे. चिंचुरानी, पी. राजीव, के. बी. गणेश कुमार, व्ही. एन. वासवन, व्ही. शिवनकुट्टी, व्ही. अब्दुरहमान, ए. के. ससीद्रन आणि रोशी ऑगस्टीन हे आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर आहेत.






