गुवाहाटी Assam assemble election : आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार, सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएनं बहुमताचा आकडा पार केला असून, हे राज्यात त्यांच्या सत्तेत परत येण्याचे एक प्रबळ संकेत आहे. प्राथमिक कलानुसार, भाजपा आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल. प्राथमिक कलानुसार, हिमंता बिस्वा सरमा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला सत्तेवर नेण्यास सज्ज आहेत. 126 सदस्यीय विधानसभेच्या सुरु असलेल्या मतमोजणीनुसार, एनडीए 99 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष 25 जागांवर आघाडीवर आहेत.
हेही वाचा : तामिळनाडूत सर्वात मोठा उलटफेर! पहिल्याच निवडणुकीत थलपती साकारणार ‘विजय’? सत्ताधारी
हिमंता आणि गोगोई आपापल्या जागांवर आघाडीवर :
राजकीय दिग्गजांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा त्यांच्या पारंपरिक जलुकबारी मतदारसंघात आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे प्रमुख नेते गौरव गोगोई जोरहाट विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहेत. भाजपा आपले मित्रपक्ष, आसाम गण परिषद आणि यूपीपीएल यांच्यासोबत युती करुन ही निवडणूक लढवत आहे आणि सलग तिसऱ्यांदा सत्तेवर परतण्याची आशा बाळगून आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था :
मतमोजणी केंद्रे आणि ईव्हीएम असलेल्या स्ट्रॉंग रूम्समध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) 25 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. आसाममध्ये 9 एप्रिल रोजी मतदान झाले, ज्यात 25 लाखांहून अधिक मतदारांपैकी 85.96% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
जलुकबारी हिमंता यांचा अभेद्य किल्ला :
राज्यातील सर्वात चुरशीचा मतदारसंघ असलेला जलुकबारी विधानसभा मतदारसंघ, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासाठी एक अभेद्य किल्ला मानला जातो. प्राथमिक कलानुसार मुख्यमंत्री हिमंता आघाडीवर आहेत. सरमा यांनी या मतदारसंघात अनेक वर्षांपासून आपले वर्चस्व कायम ठेवलं आहे. यावेळी विरोधी पक्ष काही यश मिळवू शकतील की सरमा आपल्या विजयाचं अंतर आणखी वाढवतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आसाममध्ये बहुमताचा आकडा किती :
आसाममध्ये सत्ता मिळवण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 64 आहे. आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहेत. नियमांनुसार, सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागते. बहुमतासाठी एकूण जागांच्या निम्म्याहून किमान एक जागा अधिक असणं आवश्यक आहे. म्हणजेच, 64 किंवा अधिक आमदार असलेला कोणताही पक्ष किंवा आघाडी राज्यपालांसमोर सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकते. जर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर त्याला त्रिशंकू विधानसभा म्हणतात, जिथे निवडणुकीनंतरच्या आघाड्यांची भूमिका निर्णायक ठरते.






