कोलकाता Rahul Gandhi Allegations : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भारतीय जनता पक्षाला प्रचंड विजय मिळवून दिला आहे. विरोधी पक्षांनी भाजपाच्या विजयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सरकारवर मतचोरीचे गंभीर आरोप केले आहेत. भाजपाच्या प्रचंड विजयानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली, ज्यामुळं वाद निर्माण झाला आहे.
हेही वाचा : ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी राजीनामा देणार नाही; असं झाल्यास काय
राहुल गांधींची पोस्ट काय :
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, कधीकधी मतचोरी करुन जागा चोरल्या जातात, तर कधीकधी संपूर्ण सरकारेच चोरली जातात. भाजपला थेट लक्ष्य करत त्यांनी पुढे लिहिले, “लोकसभेतील 240 भाजपा खासदारांपैकी जवळपास प्रत्येक सहावा खासदार मतचोरीनं जिंकला आहे.”
हरियाणातील सरकार घुसखोर – राहुल :
राहुल गांधी यांनी हरियाणा सरकारला घुसखोर संबोधत लिहिलं, “त्यांना ओळखणं अवघड नाही, भाजपाच्याच भाषेत आपण त्यांना ‘घुसखोर’ म्हणायचं का? आणि हरियाणाचं काय? तिथलं संपूर्ण सरकारच ‘घुसखोर’ आहे. जे संस्थांना आपल्या खिशात ठेवतात, जे मतदार याद्या आणि निवडणूक प्रक्रियेत फेरफार करतात ते स्वतःच “रिमोट-कंट्रोल” आहेत. राहुल गांधी यांनी एक धाडसी दावा केला आहे, की भाजपाची खरी भीती खरी आहे. कारण जर निवडणुका निष्पक्ष असत्या, तर त्यांना आज 140 जागाही मिळाल्या नसत्या. या पोस्टमुळं नक्कीच राजकीय गदारोळ माजेल.
ममतांचा 15000 हून अधिक मतांनी पराभव :
भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगाल निवडणुकीत 207 जागा जिंकून इतिहास रचला. दरम्यान, तृणमूल काँग्रेसला केवळ 80 जागांवर समाधान मानावं लागलं आणि काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावं लागलं. बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी भाजपाचे सुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या. सुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा 15,000 हून अधिक मतांच्या फरकानं पराभव केला. मात्र, ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील हा निवडणुकीतील पराभव स्वीकारण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या, “मी हरलेली नाही, उलट माझी मतं चोरली गेली आहेत.” याच संदर्भात, आज समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे देखील ममता बॅनर्जी यांना भेटण्यासाठी कोलकाताला जाणार आहेत.












