अहमदाबाद IPL 2026 : आयपीएलच्या परंपरेनुसार, अंतिम सामना गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळला जातो. आरसीबीनं आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावलं, परंतु अंतिम सामना बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार नाही. तर तो सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मे रोजी आयपीएल 2026 चा विजेतेपदाचा सामना आयोजित केला जाईल. प्लेऑफचे सामने 26 मे पासून सुरु होतील.
हेही वाचा : तामिळनाडूत ‘विजय’चा मार्ग सोपा; सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं दिला थलपतीच्या TVK
अहमदाबादमध्ये विक्रमी चौथा अंतिम सामना होणार :
गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. 2022, 2023 आणि 2025 चे अंतिम सामने देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवरच झाले होते. यामुळं सर्वाधिक आयपीएल अंतिम सामने आयोजित करण्याचा विक्रमही प्रस्थापित होईल. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर यापूर्वीच तीन अंतिम सामने आयोजित करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी अंतिम सामना कोलकाता इथं होणार होता, परंतु पावसाच्या शक्यतेमुळं विजेतेपदाचा सामना अहमदाबादला हलवण्यात आला होता.
बंगळूरुत अंतिम सामना का नाही? :
बंगळूरुला अंतिम सामन्याचं यजमानपद न मिळाल्यानंतर, बीसीसीआयनं एका निवेदनात म्हटलं आहे, “सुरुवातीला अंतिम सामन्याचं यजमानपद बंगळूरुला देण्यात आलं होतं. मात्र, स्थानिक संघटना आणि अधिकाऱ्यांच्या काही मागण्या बीसीसीआयच्या स्थापित मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांच्या कक्षेबाहेर असल्यानं, स्थळ बदलण्यात आले असून ते निश्चित करण्यात आले आहे.”
26 पासून प्लेऑफचा थरार :
गट फेरीचा शेवटचा सामना 24 मे रोजी खेळला जाईल. प्लेऑफ 26 तारखेपासून सुरु होतील. पहिला क्वालिफायर धरमशाला इथं होईल. एलिमिनेटर सामना 27 मे रोजी न्यू चंदीगड इथं खेळला जाईल. दुसरा क्वालिफायर सामना 29 मे रोजी न्यू चंदीगड इथं खेळला जाईल. त्यानंतर अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबाद इथं क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 च्या विजेत्यांमध्ये खेळला जाईल.












