चेन्नई Congress Extended Support to Vijay : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीव्हीके (तामिळगा वेत्ती कळघम) पक्षाबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीव्हीकेचे प्रमुख थलपथी विजय आज राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा आपला दावा सादर करणार आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसनं दोन मंत्र्यांच्या मागणीसह टीव्हीकेला पाठिंबा दिल्याचं समोर आलंय. लवकरच टीएनसीसी कार्यालयात एक बैठक होणार आहे. या बैठकीनंतर काँग्रेसचे पाच आमदार विजय यांची भेट घेऊन राज्यपालांना पाठिंब्याचं पत्र सादर करतील.
हेही वाचा : मंत्रिमंडळ बैठकीत आदिवासी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी महत्वपूर्ण निर्णय
काँग्रेसवर डीएमके नाराज :
टीव्हीकेला काँग्रेसनं दिलेल्या पाठिंब्यामुळं डीएमके अत्यंत नाराज आहे. काँग्रेसनं आपला विश्वासघात केला असून 2029 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं डीएमकेनं म्हटलं आहे. दरम्यान, एआयएडीएमकेच्या काही आमदारांनी पक्षाचे सरचिटणीस एडप्पाडी पलानीस्वामी यांच्याकडे टीव्हीकेला बाहेरुन पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे, ज्यावर आज निर्णय घेतला जाईल. डाव्या पक्षांनी आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी 8 मे पर्यंतची मुदत मागितली आहे. तर आययूएमएलच्या दोन आमदारांनी डीएमके आघाडीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले काँग्रेसचे नेते :
काँग्रेसचे नेते के.सी वेणुगोपाल म्हणाले, “काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की, तामिळनाडूमध्ये संविधानाचं रक्षण करण्यास वचनबद्ध असलेल्या धर्मनिरपेक्ष सरकारला जनादेश मिळाला आहे. भाजपा किंवा त्यांच्या मित्रपक्षांनी कोणत्याही प्रकारे तामिळनाडू सरकार चालवावं, हे काँग्रेसला अजिबात नको आहे. काँग्रेस नेतृत्वानं तामिळनाडू काँग्रेस कमिटीला (TNCC) निर्देश दिले आहेत की, निवडणुकीच्या निकालांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या राज्यातील जनतेच्या भावनांचा विचार करून विजय यांच्या विनंतीवर अंतिम निर्णय घ्यावा.”
टीव्हीकेचा सरकार स्थापनेचा दावा :
दरम्यान विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्यानंतर विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेनं तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आपल्या दमदार निवडणूक कामगिरीच्या आधारावर, विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीकेनं राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्याकडे सरकार स्थापन करण्याचा आपला हक्क सांगितला आहे आणि सभागृहात आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. या घडामोडीमुळं संभाव्य युतीबद्दलच्या अटकळांना वाव मिळाला आहे, कारण टीव्हीके सध्या बहुमताच्या आकड्यापासून 10 जागांनी मागे आहे.







