हैदराबाद KKR Beat SRH : आयपीएलच्या 45व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं अचूक गोलंदाजी आणि कर्णधार अजिंक्य रहाणे व अंगक्रिश रंगुवंशी यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला.
हेही वाचा : गॅस संकटात मोठा दिलासा! 45,000 टन गॅस घेऊन ‘सर्व शक्ती’
सलग पाच सामने जिंकल्यावर एसआरएचचा पराभव :
हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2026 चा हा 45 वा सामना होता. या हंगामातील 9 सामन्यांमधील केकेआरचा हा तिसरा विजय असून, ते आता गुणतालिकेत 8व्या स्थानावर पोहोचले आहेत. प्रथम गोलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 19 षटकांत सर्वबाद 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात, केकेआरनं 10 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले. यामुळं सलग पाच सामने जिंकल्यानंतर सनरायझर्सच्या विजयी घोडदौडीला खीळ बसली.
रघुवंशीचं शानदार अर्धशतक :
लक्ष्याचा पाठलाग करताना, केकेआरचा कर्णधार रहाणेनं 4 चौकार आणि 1 षटकार मारत 36 चेंडूंमध्ये 45 धावांची दमदार खेळी केली. अंगक्रिश रघुवंशीनंही 47 चेंडूंमध्ये 59 धावांची खेळी केली. रघुवंशीनं आपल्या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले, तर रिंकू सिंगनं 11 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या. कॅमेरॉन ग्रीननं शेवटच्या षटकात 3 धावा केल्या. या दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर केकेआरनं प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आपली आशा जिवंत ठेवली. गोलंदाजीत हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्स, शिवांग कुमार आणि शकिब हुसेन यांना प्रत्येकी फक्त 1 बळी घेता आला.
सनरायझर्सची फलंदाजी निराशजनक :
सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज या सामन्यात निराशाजनक ठरले. ट्रॅव्हिस हेड आणि इशान किशन वगळता इतर कोणालाही क्रीजवर जास्त वेळ टिकता आलं नाही. ट्रॅव्हिस हेडनं संघासाठी 28 चेंडूंमध्ये सर्वाधिक 61 धावा केल्या. इशान किशननंही 29 चेंडूंमध्ये 42 धावांचं योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त संघाची संपूर्ण फलंदाजी फळी अपयशी ठरली, परिणामी 19 षटकांत केवळ 165 धावांवर संघ सर्वबाद झाला. गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास, केकेआरसाठी वरुण चक्रवर्तीनं सर्वाधिक तीन बळी घेतले. सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले, तर वैभव अरोरा, कॅमेरॉन ग्रीन आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.











