कोलकाता Mamata Banerjee : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं आहे. यामुळं नवा राजकीय वाद निर्माण झालाय. “मी हरले नाही, मला हरवण्यात आलं आहे,” असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला जबाबदार धरलं. आता, जर ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार देत असतील, तर भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होईल? भाजपानं म्हटले आहे की, शपथविधी सोहळा 9 मे रोजी पार पडेल. पुढं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा : आंदोलकांवर लाठीचार्ज, ही तत्परता गुन्हेगारांबाबत का नाही? राज यांचा उद्विग्न
ममता बॅनर्जी यांचा राजीनामा देण्यास नकार :
ममता बॅनर्जी यांच्या, “मी राजीनामा देणार नाही, मी हरलेली नाही,” या वक्तव्यासंदर्भात, माजी सहायक सरकारी वकील आणि ज्येष्ठ वकील पिंकी आनंद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला बोलताना सांगितलं, “इतका काळ राज्याचं नेतृत्व केलेल्या व्यक्तीकडून असं वक्तव्य येणं खूप आश्चर्यजनक आहे. त्यांचा हा युक्तिवादसुद्धा सर्व घटनात्मक नियमांच्या विरुद्ध आहे. हे घटनेत स्पष्टपणे नमूद केलेलं नाही; मात्र, घटनात्मक नैतिकता आणि सर्व घटनात्मक नियमांनुसार, जर एखाद्या पक्षानं जनतेचा विश्वास गमावला आणि मुख्यमंत्र्यांनीही आपली जागा गमावली. मात्र निवडणुकीत काही अडचण असेल, तर निवडणूक याचिकेद्वारे निवडणुकीला आव्हान देणं हाच योग्य मार्ग आहे.”
ममता यांनी राजीनामा दिला नाही तर काय होईल? :
ज्येष्ठ वकील म्हणाले, “केवळ जनतेच्या विश्वासानं जिंकलेली जागा हरल्यानंतर तुम्ही त्यावर दावा करु शकत नाही. जर जनतेनं तुमच्यावरील विश्वास गमावला असेल, तर घटनात्मक नैतिकता अगदी स्पष्ट आहे. जर त्यांनी जनतेचा विश्वास गमावला असेल, आणि तो त्यांनी गमावला आहेच, तर राज्यपाल या वेळीसुद्धा बहुमत चाचणीचा आदेश देऊ शकतात. बहुमत चाचणीत जर त्या हरल्या, तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. यावर चर्चा करण्यासारखे काहीही उरलेलं नाही. तिसरं म्हणजे, सध्याची परिस्थिती अशी आहे की 7 मे रोजी विधानसभा विसर्जित करण्यात येईल. त्यामुळं, 8 मे रोजी, त्यांच्यासह विधानसभेच्या सर्व सदस्यांनी आपल्या जागा रिक्त केल्या आहेत असं मानलं जाईल आणि या संदर्भात खरोखरच करण्यासारखं काहीही उरलेलं नाही.












