Smartphone Charging Tips: तुम्हीही सतत फोन 100% चार्ज करत असाल, तर हा नियम लगेच जाणून घ्या; नाहीतर मोबाईलची बॅटरी लवकर खराब होऊ शकते. कसं? चला जाणून घेऊया.
स्मार्टफोन वापरणाऱ्या अनेकांची एक सामान्य सवय म्हणजे फोन नेहमी १०० % चार्ज करून ठेवणे. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही सवय बॅटरीच्या आरोग्यासाठी योग्य नाही. आजच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये लिथियम आयन- बॅटरी वापरली जाते आणि अशा बॅटरीवर सतत पूर्ण चार्जिंगचा ताण आल्यास तिची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ शकते.
हेही वाचा: आनंदाची बातमी! आता ‘या’ शिक्षकांना TET मधून मिळणार सूट; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल काय?
तज्ज्ञ सांगतात की, फोनची बॅटरी दीर्घकाळ चांगली ठेवायची असेल तर “20-80 नियम” पाळणे फायदेशीर ठरू शकते. म्हणजेच बॅटरी 20 टक्क्यांखाली जाऊ देऊ नये आणि 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केल्यानंतर चार्जर काढणे अधिक सुरक्षित मानले जाते. या पद्धतीमुळे बॅटरीवर कमी ताण येतो आणि तिचे आयुष्य वाढण्यास मदत होते.
वारंवार १०० % टक्के चार्जिंग केल्यास बॅटरी जास्त गरम होण्याची शक्यता वाढते. विशेषतः चार्जिंगदरम्यान गेम खेळणे, व्हिडीओ पाहणे किंवा हेवी अँप्स वापरणे यामुळे फोनचे तापमान वाढते आणि त्याचा परिणाम बॅटरीवर होऊ शकतो.
नवीन फीचर्स
स्मार्टफोन कंपन्यांनीही आता बॅटरी हेल्थ लक्षात घेऊन नवीन फीचर्स देण्यास सुरुवात केली आहे. Apple च्या iPhone मध्ये “Optimized Battery Charging” आणि चार्ज लिमिटसारखे पर्याय उपलब्ध आहेत. तर Samsung आणि इतर Android ब्रँड्समध्ये “Battery Protection” किंवा “Adaptive Charging” सारखी फीचर्स दिली जात आहेत. या फीचर्समुळे फोन दीर्घकाळ 100 टक्के चार्ज राहणे टाळले जाते.
दर्जेदार चार्जर वापरणे
याशिवाय, चार्जिंग करताना मूळ किंवा दर्जेदार चार्जर वापरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. खराब दर्जाच्या चार्जरमुळे बॅटरीचे नुकसान होऊ शकते. तसेच फोन उशीखाली किंवा बंद जागेत चार्ज करणे टाळावे, कारण त्यामुळे उष्णता वाढून बॅटरीवर परिणाम होऊ शकतो.
योग्य चार्जिंग सवयी अंगीकारल्यास स्मार्टफोनची बॅटरी अधिक काळ टिकू शकते आणि फोनची कार्यक्षमता देखील चांगली राहण्यास मदत होते.







