Karad Crime : महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करून उसाच्या शेतात लपलेल्या सराईत गुन्हेगाराला कराड तालुका पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने अटक केली. सातारा पोलिसांच्या श्वान पथकातील ‘जॅक’ याने आरोपीचा माग काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
ही घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास दुशेरे (ता. कराड) येथील नदीकाठच्या डाग शिवारात घडली. शेतात जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळताच कराड तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळी विनानंबरची दुचाकी आणि त्यावर कपड्यांची पिशवी आढळून आली. प्रत्यक्षदर्शींनी संशयित उसाच्या शेतात गेल्याचे पोलिसांना सांगितले.
नदीकाठची बाजू वगळता परिसराच्या चारही बाजूंना उसाचे पीक असल्याने पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी श्वान पथकाची मदत घेण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा : फक्त पुण्यातच दारूबंदी का?” हायकोर्टाचा सवाल; गणेशोत्सवात मोठा निर्णय उलटला!
घटनास्थळी विनानंबरची दुचाकी आणि कपड्यांची पिशवी सापडली ( Karad Crime )
त्यानुसार सायंकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. घटनास्थळी सापडलेल्या दुचाकीवरील पिशवीतील कपड्यांचा वास श्वान ‘जॅक’ ( Dog Squad Jack ) याला देण्यात आला. जॅकने थेट उसाच्या शेताकडे माग काढत तेथे लपलेल्या संशयिताचा ठावठिकाणा पोलिसांना दाखवून दिला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता त्याची ओळख वैभव विठ्ठल कोठावळे (वय २७, रा. माळवाडी-मजले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी झाली.
याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीकडून मिळालेली यामाहा आर-१५ दुचाकी चोरीची असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर वाहन सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६७/२०२६, कलम ३०३(२) मधील असल्याचे समोर आले असून वाहन क्रमांक एमएच १० डीझेड ९९५५ आहे. तसेच आरोपीविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यातही भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३०८(२), ११७(२) अन्वये गुन्हा दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपीचा शोध सुरू होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. डीबी पथकाचे सपोनि प्रकाश भुजबळ, पोउपनि धनंजय पाटील, एएसआय खाडे, पोलीस हवालदार दत्तात्रय तायशेटे, मनोज बुधावले, सचिन निकम, पोलीस नाईक भूषण माने तसेच पोलीस शिपाई प्रफुल्ल गाडे, योगेश गायकवाड, प्रदीप धस आणि विकास शेडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोउपनि धनंजय पाटील करीत आहेत.








