Tigress and Four Cubs Death : मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये अवघ्या एका आठवड्यात वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सर्व मृत्यूमागे केनाईन डिस्टेंपर व्हायरस CDV हा कुत्र्यांपासून पसरणारा घातक विषाणू कारणीभूत असल्याचे तपासातून सिद्ध झाले. या घटनेमुळे वन्यजीव संवर्धन यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून देशातील इतर व्याघ्र प्रकल्पांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसात टी-141या वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा एकामागोमाग मृत्यू झाल्याची माहिती आहे.
जबलपूर येथील स्कूल ऑफ वाइल्डलाइफ फॉरेन्सिक अँड हेल्थ प्रयोगशाळेत मृत वाघीण आणि बछड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालात पाचही वाघांचा मृत्यू केनाईन डिस्टेंपर व्हायरसमुळे झाल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. हा विषाणू प्रामुख्याने कुत्रावर्गीय प्राण्यांमध्ये आढळतो, मात्र अलीकडील काळात तो वाघ आणि बिबट्यासारख्या मांजरवर्गीय प्राण्यांमध्ये पसरताना दिसत आहे, त्यामुळेच वाघ आणि बिबट हे मांजर वर्गीय प्राणी केनाईन डिस्टेंपर वायरसमुळे आजारी पडत आहेत. ही बाब वनविभागासाठी अत्यंत चिंताजनक ठरत आहे.
पाणवठ्यांमध्ये संक्रमित कुत्र्यांच्या संपर्कामुळे पाणी दूषित
वाघ किंवा बिबट्यांनी केलेली शिकार अनेकदा अर्धवट सोडली जाते आणि नंतर ती पुन्हा खाण्यासाठी ते परत येतात. या दरम्यान जंगलालगतच्या गावांमधील कुत्रे त्या शिकारीवर ताव मारतात आणि जर ते संक्रमित असतील, तर त्या माध्यमातून विषाणू वाघांपर्यंत पोहोचतो. असं मत अनेक तज्ज्ञांनी मांडले आहे. काही वेळा वाघांनी थेट संक्रमित कुत्र्यांची शिकार केल्यासही विषाणू त्यांच्या शरीरात प्रवेश करतो. या विषाणूचा प्रसार अनेक मार्गांनी होऊ शकतो. तसेच पाणवठ्यांमध्ये संक्रमित कुत्र्यांच्या संपर्कामुळे पाणी दूषित होऊन त्यातूनही संसर्ग होऊ शकतो.
वाघ बिबट्यांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण
हा विषाणू कुत्र्यांमध्ये प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम करतो, मात्र वाघ बिबट्यांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करतो. श्वसनसंस्थेसोबतच हा विषाणू मज्जासंस्थेवरही परिणाम करतो.यामुळे वर्तनात बदल, दिशाभूल, शिकार करण्याची क्षमता कमी होणे असे परिणाम जाणवू लागले आहेत. काही प्रकरणांमध्ये प्राणी आपली नैसर्गिक प्रवृत्तीही विसरू शकतात, अशी गंभीर स्थिती निर्माण होताना पहायला मिळाली.
40 कॅमेरा ट्रॅप बसवून वाघांच्या हालचालींवर लक्ष
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घटना घडलेल्या भागात सुमारे पाच किलोमीटर परिसर नो गो झोन म्हणून घोषित केला आहे. सुमारे 40 कॅमेरा ट्रॅप बसवून वाघांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय पाणवठ्यांचे आणि प्राण्यांच्या विष्ठेचे नमुने गोळा करून तपासणी सुरू आहे. वाघांचे थेट लसीकरण करणे शक्य नसल्याने व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील सुमारे 90 गावांमधील कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यावर भर देण्यात आलाय.
11 वाघ, 17 बिबट्या आणि 54 सिंहांना याच विषाणूची लागण
कॅनाईन डिस्टेंपर हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू असून तो प्रामुख्याने पाळीव कुत्र्यांमधून वन्य प्राण्यांमध्ये पसरतो. 2012 ते 2017 या कालावधीत भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने 11 वाघ, 17 बिबट्या आणि 54 सिंहांना याच विषाणूची लागण झाल्याचे सिद्ध केले होते. अश्याचप्रकारे 2015 साली पन्ना व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीचा मृत्यू झाला होता. संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून किंवा त्यांच्या स्रावांद्वारे हा विषाणू जलद गतीने इतर प्राण्यांपर्यंत पोहोचू शकतो. गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून वाघांच्या मृत्यूमुळे पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा फटका बसू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. वनविभागाने मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केल्याच म्हटंलंय.
या घटनेनंतर केवळ कान्हापुरतीच नव्हे तर इतर व्याघ्र प्रकल्पांबाबतही चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील वाघांनाही अशाच प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. त्यामुळे या भागांमध्येही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची असल्याचे स्पष्टिकरण देण्यात आलंय. कुत्र्यांपासून पसरणारा हा विषाणू आता वाघांसारख्या वन्यप्राण्यांसाठी मोठा धोका बनलाय. वेळेत प्रभावी उपाययोजना न केल्यास याचे गंभीर परिणाम देशातील वाघसंवर्धनावर होऊ शकतात, असा इशारा वन्य़विभाने दिलाय.











