Male Green Sea Turtle at Bagmandla Beach : श्रीवर्धन तालुक्यातील मौजे बागमांडला येथील समुद्रकिनाऱ्यावर प्रथमच नर जातीचे ग्रीन सी टर्टल (Green Sea Turtle) आढळून आल्याने वन्यजीव प्रेमी व वनविभागात खळबळ उडाली आहे.
बागमांडला येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीजवळील चिखलपट्टीत एक मोठे कासव वाहून आल्याचे निदर्शनास येताच, तेथे काम करणारे आकाश सुरेश पाडलेकर यांनी तात्काळ कांदळवन कक्ष, दक्षिण कोकण कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर वनरक्षक, कासव तज्ज्ञ व कासव मित्र यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
ग्रीन सी टर्टल प्रजातीचे नर कासव
तपासणीत हे कासव ग्रीन सी टर्टल प्रजातीचे नर कासव असल्याचे स्पष्ट झाले. अंदाजे 200 किलो वजनाच्या या कासवाची लांबी (डोके ते शेपूट) 190 सेंमी (6 फूट 3 इंच), पाठीची लांबी 65 सेंमी, रुंदी 62.5 सेंमी तर शेपटीची लांबी 36 सेंमी आहे. ओहोटीमुळे हे कासव किनाऱ्यावर वाहून आले असावे, असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. सखोल तपासणीत कासवाला कोणतीही दुखापत नसल्याचे आढळून आले.
हे ही वाचा : HSRP नंबरप्लेट बसवली नसेल तर होणार दंडात्मक कारवाई; कारवाई टाळण्यासाठी करा हा उपाय
नैसर्गिक अधिवासात मुक्त
मारळ येथील जयंत कानडे, संकेत मयेकर, हरिहरेश्वर येथील संतोष मयेकर, सुबोध खोपटकर, कांदळवन विभागाचे वनरक्षक तुषार भटे व ऋषिकेश लव्हटे, कासव तज्ज्ञ मोहन उपाध्ये, स्थानिक ग्रामस्थ व फेरीबोटीवरील कामगार यांच्या सहकार्याने या कासवाला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
नर ग्रीन सी टर्टल आढळण्याची पहिलीच वेळ
कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सागरी कासवांच्या पाच प्रजाती आढळतात. यापूर्वी या भागात ग्रीन सी टर्टलच्या माद्या आढळल्या होत्या, मात्र नर ग्रीन सी टर्टल आढळण्याची ही रायगड जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
विभागी वन विभागाचे आवाहन
दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर किंवा खाडीत अशा प्रकारचे सागरी कासव आढळल्यास तात्काळ कांदळवन विभागाला कळवावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (कांदळवन), दक्षिण कोकण – श्रीमती कांचन पवार यांनी केले आहे.










