Sharib Hashmi | ‘द फॅमिली मॅन’ (The Family Man) ही ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी वेब सीरिजपैकी एक आहे. या सीरिजमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) सोबत त्याचा मित्र जे.के.तळपदे (J.K.Talpade) हे पात्र देखील प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं होतं. या सुपरहीट वेब सीरिजमध्ये जे.के. तळपदेची भूमिका प्रसिद्ध अभिनेता शारिब हाशमीने (Sharib Hashmi) साकारली आहे. जे.के. तळपदेची भूमिका साकारल्यानंतर शारिब हाशमीच्या चाहत्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज त्याचा लाखोंच्या संख्येत चाहतावर्ग आहे. तर आपल्या अभिनयाने सतत चर्चेत असणारा शारिब हाशमी सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टी हादरली; नेमकं घडलं काय?
शारिब हाशमीच्या पत्नीला सहाव्यांदा कॅन्सरचे निदान
शारिब हाशमीची पत्नी नसरीन हाशमीला (Nasreen Hashmi) पुन्हा एकदा कॅन्सरचे निदान झाले आहे. नसरीनने आतापर्यंत पाच वेळा कॅन्सरवर मात केली आहे. आत्तापर्यंत तिच्यावर पाच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र, आता तिला सहाव्यांदा कॅन्सरसोबत लढा द्यावा लागणार आहे. ज्यामुळे शारिब पूर्णपणे खचून गेला आहे.
पत्नीच्या कॅन्सरच्या लढ्याबाबत काय म्हणाला शारिब हाशमी?
शारिब हाशमी आणि त्याची पत्नी नसरीन यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, नसरीनचा तोंडाचा कर्करोग सहाव्यांदा परत आला आहे. शारिबने सांगितले केले की, 2018 मध्ये जेव्हा त्याला नसरीनच्या आजाराबद्दल कळले तेव्हा तो पूर्णपणे खचून गेला होता. या परिस्थितीबद्दल बोलताना तो म्हणाला, आतापर्यंत तिच्यावर पाच शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि तो सहाव्यांदा परत आला आहे. यावेळी तो तिच्या संपूर्ण शरीरात पसरला आहे. तसेच सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पण हे संकटही निघून जाईल.
नसरीनने ज्या धैर्याने याचा सामना केला आहे त्याने आम्हा सर्वांना बळ दिले. तिचा कर्करोग खूप आक्रमक आहे, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा हल्ला करत राहतो. पण ती मोठ्या धैर्याने त्याचा सामना करत आहे, अशी माहिती शारिबने दिली.
पुढे शारिबने कर्करोगाच्या लढ्यात आपल्याला कशी साथ दिली याबाबत नसरीनने सांगितले. ती म्हणाली की, व्यस्त वेळापत्रकातही शारिब प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळी माझ्यासोबत होता आणि त्याने मला खूप आधार दिला आहे. त्याने माझी साथ कधीच सोडली नाही. तो कितीही शूटिंगमध्ये व्यस्त असला तरी तो रुग्णालयात भेटायला कसातरी वेळ काढायचा. मी रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते मला डिस्चार्ज मिळेपर्यंत तो त्याची बॅग घेऊन तिथेच बसून राहायचा. मला डिस्चार्ज मिळेपर्यंत तो तिथून हलायचा नाही. तो अशाप्रकारे माझ्यासोबत असणे मला खूप आवडते. तो प्रत्येक अर्थाने माझ्यासोबत आहे, असं नसरीनने सांगितलं.
दरम्यान, शारिब हाशमी आणि नसरीन हाशमी यांची प्रेमकथा 27 डिसेंबर 2003 रोजी सुरू झाली होती. त्यांनी तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपला संसार प्रेमाने टिकवत एकमेकांना भक्कम साथ दिली आहे. आज त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर शारिबने 2008 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याला 2012 मध्ये आलेल्या ‘फिल्मिस्तान’ या चित्रपटात कुमुद मिश्रा यांच्यासोबत मुख्य भूमिका मिळाली होती. मात्र तेव्हा तो जास्त प्रसिद्धीझोतात आला नव्हता. मात्र, नंतर ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये जे. के. तळपदेची भूमिका साकारल्यानंतर तो चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला.







