Lal Pari Ticket Fare Hike : सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘लालपरी’वर (ST Fare Hike) आता महागाईचं सावट आहे. भारतात महागाईचा भडका उडाला असून याचा परिणाम महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीला बसण्याची शक्यता आहे. मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारतात महागाई वाढू लागली आहे. प्रथम दुधाच्या, त्यानंतर सीएनजीच्या आणि आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Prices) लक्षणीय वाढ झालीय. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या एसटी बसचं भाडेवाढ करण्याबाबत चर्चा सुरु आहे.
हेही वाचा – lal-pari-ticket-fare-hike
जगभरात सुरू असलेल्या युध्दाच्या आणि भू-राजकीय वादाचा फटका अनेक देशाना बसताना दिसत आहे. आधी दूध, मग सीएनजी, सोने-चांदी, त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या दरातही मोठी दरवाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. डिझेल दरवाढीमुळे कोट्यावधींचा अतिरिक्त भार एसटी महामंडळावर पडत आहे. त्यामुळे आता एसटी बस तिकीट दरातही वाढ होणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत, अशातच शिवसेना नेता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे संकेत दिले आहेत. यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचे संकेत
राज्यात वाढत्या इंधन दरांचा परिणाम आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही दिसू लागला आहे. डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला असून, आगामी काळात एसटी बसच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना सरनाईक यांनी सांगितले की, एसटी महामंडळाला दररोज मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते आणि अलीकडेच इंधन दरात वाढ झाल्याने महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिझेलच्या वाढलेल्या किंमतीमुळे दररोज लाखो रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत असून वर्षभरात हा आर्थिक ताण कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.
सरकारने आर्थिक मदत केली, तर भाडेवाढ टाळली जाऊ शकते
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आणि भू-राजकीय तणावाचा परिणाम इंधन दरांवर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास इंधन दरात आणखी वाढ होऊ शकते, त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून काही विशेष सवलत मिळाल्यासच ST तिकीट दरवाढ टाळता येईल, असे त्यांनी सांगितले. सरकारकडून मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पुढील काही दिवस परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. जर इंधन कंपन्यांकडून जुन्या दराने डिझेल उपलब्ध झाले किंवा सरकारने आर्थिक मदत केली, तर भाडेवाढ टाळली जाऊ शकते. मात्र तसे न झाल्यास ST तिकीट दर वाढविण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलंय.
एसटी महामंडळाने आता पर्यायी इंधनाकडे लक्ष वळवले
वाढत्या डिझेल दरांवर कायमस्वरूपी उपाय म्हणून एसटी महामंडळाने आता पर्यायी इंधनाकडे लक्ष वळवले आहे. २०३५ पर्यंत महामंडळाच्या सर्व बसेस ‘इलेक्ट्रिक’ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. सध्या जरी ८ हजार नवीन डिझेल बसेस ताफ्यात आल्या असल्या, तरी भविष्यात केवळ इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीवरच भर दिला जाणार आहे.
राज्यात २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू
इलेक्ट्रिक बसेससाठी राज्यात २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, शहरांमधील एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी आणि एमएसआरडीसीच्या पुलांखालील मोकळ्या जागांचा वापर यासाठी करण्याची योजना आहे. या जागांवर सध्या होणारे अनधिकृत पार्किंग आणि अस्वच्छता रोखून तिथे ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात आला आहे. एकूणच, प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आणि महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी आता सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा झळ सोसावा लागण्याची चिन्हं आहेत.











