Donald Trump | मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्ध होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. अमेरिका (US) आणि इराण (Iran) या दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याचं नाव काही घेत नाहीये. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्तावावर अद्याप कोणताही करार झालेला नाहीये. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे.
हेही वाचा – अमेरिकेत मशिदीवर गोळीबाराचा थरार; 3 जण ठार, हल्ल्यानंतर आरोपींनी केलं धक्कादायक कृत्य
इराणवर हल्ला करण्याबाबत नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक धक्कादायक दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, अमेरिका आज इराणवर हल्ले करणार होती, मात्र कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या विनंतीवरून हा हल्ला पुढे ढकलण्यात आला आहे, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे.
“मी इराणवरील हल्ला काही काळासाठी पुढे ढकलला आहे. आशा आहे की आमचा हा निर्णय कदाचित कायमचा असू शकतो पण शक्यतो काही काळासाठीचा आहे. कारण आमची इराणसोबत खूप मोठी चर्चा झाली आहे आणि त्यातून काय निष्पन्न होतं ते आपण पाहू. सौदी अरेबिया, कतार, यूएई आणि इतर काही देशांनी मला विचारलं की आपण हा हल्ला दोन-तीन दिवसांसाठी, थोड्या कालावधीसाठी पुढे ढकलू शकतो का. कारण त्यांना वाटतं की ते करार करण्याच्या खूप जवळ पोहोचले आहेत. ही एक खूप सकारात्मक घडामोड आहे, पण त्यातून काही निष्पन्न होते की नाही हे आपण पाहू”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, कतारचे अमीर, तमीम बिन हमद अल थानी, सौदी अरेबियाचे युवराज, मोहम्मद बिन सलमान अल सौद आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष, मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी मला आज इराणवर नियोजित लष्करी हल्ला पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. कारण त्यांच्या मते महान नेते आणि मित्रराष्ट्र म्हणून असा एक करार होईल जो अमेरिका तसेच मध्य पूर्व आणि त्यापलीकडील सर्व देशांना मान्य असेल.
#WATCH | US President Donald Trump says, “…I put it (attack on Iran) off for a little while, hopefully maybe forever, but possibly for a little while because we’ve had very big discussions with Iran and we’ll see what they amount to. I was asked by Saudi Arabia, Qatar, UAE and… https://t.co/q2qVNckfBY pic.twitter.com/g1FWpQhtUn
— ANI (@ANI) May 18, 2026
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या करारामुळे इराणला कोणतीही अण्वस्त्रे मिळणार नाहीत. या नेत्यांबद्दल असलेल्या माझ्या आदरापोटी मी युद्धमंत्री पीट हेगसेथ, जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅनियल केन आणि अमेरिकी सैन्याला निर्देश दिले आहेत की, आम्ही उद्या इराणवर नियोजित हल्ला करणार नाही. पण, मी त्यांना कोणत्याही क्षणी इराणवर होणाऱ्या मोठ्या हल्ल्यासाठी तयार राहण्याचे निर्देशही दिले आहेत. जर एखादा समाधानकारक करार होऊ शकला नाही, तर कृपया आम्हाला कळवा, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा देत म्हटलं आहे.












