Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • फ्रांसमधील 79 व्या कान्स चित्रपट महोत्सवात मराठी कलाकारांचा जलवा
Top News

फ्रांसमधील 79 व्या कान्स चित्रपट महोत्सवात मराठी कलाकारांचा जलवा

Marathi artists at Cannes Film Festival
64

Marathi artists at Cannes Film Festival : सिनेमा आणि फॅशनच्या जगातील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ७९ वा कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) सध्या फ्रान्समधील कान्स शहरात १२ ते २३ मे दरम्यान अत्यंत दिमाखात पार पडत आहे. जागतिक स्तरावरील या सर्वात मोठ्या कलामंचावर दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावतात. यंदाचा कान्स चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) हा महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद ठरला आहे. कारण, यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर अस्सल मराठमोळा रुबाब (The Regal Maratha Panache) पाहायला मिळाला.

मराठी चित्रपटसृष्टीचे ‘बादशहा’ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, बिग बॉस मराठी फेम ‘कोकण हर्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर यांनी यंदा कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत जागतिक मंचावर मराठी संस्कृतीचा गडद ठसा उमटवला. या कलाकारांनी केवळ रेड कार्पेटवरच हजेरी लावली नाही, तर कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘भारत पॅव्हेलियन’ येथे अभिजात मराठी या पहिल्या स्वतंत्र मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे जागतिक लॉन्चिंग केले. मराठी माणसाची कला, संस्कृती, सिनेमे आणि नाटकं आता जगाच्या पाठीवर कुठल्याही कोपऱ्यात बसून एका क्लिकवर पाहता येणार आहेत.

केदार नरहर जोशी यांचे जागतिक स्तरावर मराठी पाऊल

या ऐतिहासिक आणि महत्त्वाकांक्षी प्लॅटफॉर्मचे संस्थापक केदार नरहर जोशी यांनी जागतिक स्तरावर मराठी पाऊल पुढे टाकत हा अनोखा मंच जगासमोर आणला आहे. रेड कार्पेटवर जेव्हा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या जोडीने एन्ट्री घेतली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय छायाचित्रकरांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. पाश्चात्त्य फॅशनच्या या अथांग सागरात सराफ दांपत्याने आप ले मराठमोळेपण आणि संस्कृती जपली.अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कान्सच्या रेड कार्पेटसाठी अस्सल महाराष्ट्रीयन पेहराव निवडला होता. त्यांनी परिधान केलेली देखणी भरजरी पैठणी साडी, खांद्यावर घेतलेली भरजरी शाल, केसांचा पारंपरिक अंबाडा आणि त्यावर माळलेला मोगऱ्याचा सुवासिक गजरा अत्यंत लक्षवेधी ठरत होता.

नाकात मराठी नथ आणि गळ्यात पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने परिधान

या लूकला अधिक पारंपरिक बनवण्यासाठी त्यांनी नाकात मराठी नथ आणि गळ्यात पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने परिधान केले होते. तर आपल्या लाडक्या अशोक मामांनी पांढऱ्या रंगाची सफारी परिधान करून अत्यंत दिमाखात एन्ट्री घेतली. रेड कार्पेटवरून चालताना आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे अशोक मामांनी दोन्ही हात जोडून आंतरराष्ट्रीय माध्यमांना आणि उपस्थितांना अभिवादन केले. त्यांचा हा साधेपणा पाहून सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जागतिक मंचावर आपल्या लाडक्या कोकण भूमीचे प्रतिनिधित्व

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर कोकण हार्टेड गर्ल हिनेदेखील कान्स चित्रपट महोत्सवात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंकिताने जागतिक मंचावर आपल्या लाडक्या कोकण भूमीचे प्रतिनिधित्व केले. तिने परिधान केलेल्या शालीवर कोकणची ओळख असलेल्या नारळाच्या झाडांच्या चित्रांचे अतिशय देखणे नक्षीकाम होते. या अनोख्या डिझाईनच्या माध्यमातून तिने जागतिक मंचावर कोकण संस्कृती सादर केली. अंकिताचा हा पारंपरिक आणि रुबाबदार लूक इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्स तिचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची जादू विखुरली

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेदेखील कान्स 2026च्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची जादू विखुरली. प्राजक्ताने फॅशन आणि परंपरेचा सुरेख मेळ घालत साडी परिधान करून रेड कार्पेटवर वॉक केला. तिच्या देहबोलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी अभिनेत्रींचा डंका वाजवला. जागतिक मंचावर मराठी माणसाला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या या सर्व कलाकारांचे महाराष्ट्रातून आणि जगभरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts