Prasad Vedpathak’s Post Triggers Fresh Controversy: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर प्रसाद वेदपाठकांच्या यांनी सोसायटी परिसरातील पांढरी पट्टी हटवण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर काही प्रतिक्रिया वादग्रस्त ठरत आहेत.
मुंबईतील घाटकोपरमधील पांढऱ्या पट्टीच्या वादानंतर सोशल मीडियावर आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी पांढरी पट्टी हटवल्याची माहिती देणारी पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावरील एका रिप्लायचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. “मुंबईवर आमचंच वर्चस्व” अशा आशयाचा दावा करणाऱ्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नेटकऱ्यांमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
हेही वाचा : ‘हायअलर्ट’ जारी! पुढील काही तासांत १०० ताशी वेगाने ‘या’ राज्यांत वादळ धडकणार
व्हायरल स्क्रीनशॉटमुळे चर्चा
सोशल मीडियावर एका पोस्टचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. संबंधित पोस्टमध्ये मुंबईत केवळ जैन समाजासाठी स्वतंत्र सोसायट्या उभारण्याची आणि इतर समाजातील लोकांना प्रवेश न देण्याची भूमिका मांडण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच शहरातील वर्चस्व आणि सामाजिक विभाजनासंदर्भातील काही विधानांमुळे या पोस्टवर टीका होत आहे.
या पोस्टचा स्क्रीनशॉट विविध फेसबुक पेजेस आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी शेअर केला असून त्यावर समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.
पांढऱ्या पट्टीचा मूळ वाद काय?
काही दिवसांपूर्वी घाटकोपरमधील एका सोसायटीत जैन साध्वींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आली होती. याबाबत Prasad Vedpathak यांनी आक्षेप घेत, सोसायटीतील सर्व सदस्यांची परवानगी न घेता हा निर्णय झाल्याचा आरोप केला होता.
त्यांनी हा विषय धार्मिक भावना, सार्वजनिक जागांचा वापर आणि सोसायटी व्यवस्थापनाच्या निर्णयप्रक्रियेशी संबंधित असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या प्रकरणावर चर्चा वाढली आणि अखेरीस संबंधित पट्टी हटवण्यात आली. पट्टी काढून टाकल्याचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
पट्टी हटवल्यानंतर प्रकरण संपल्याचे संकेत देणारी पोस्ट करण्यात आली असली तरी त्यानंतर काही वापरकर्त्यांच्या प्रतिक्रियांमुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि त्यावरील चर्चेमुळे हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
दरम्यान, विविध समाजघटकांनी संयम बाळगण्याचे आणि कोणत्याही प्रकारची द्वेषभावना वाढवणारी वक्तव्ये टाळण्याचे आवाहन केले आहे.






