Breaking News :
  • Home
  • देश
  • हिमाचलमध्ये मृत्यूचा डोंगर कोसळला! धावत्या टाटा सुमोवर दरड; ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू
गुन्हा

हिमाचलमध्ये मृत्यूचा डोंगर कोसळला! धावत्या टाटा सुमोवर दरड; ६ महिन्यांच्या बाळासह १३ जणांचा मृत्यू

Himachal Landslide

Himachal Landslide: हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीती (Lahaul Spiti landslide) जिल्ह्यात शुक्रवारी (२४ जुलै) झालेल्या भीषण दरड दुर्घटनेत ६ महिन्यांच्या बालकासह १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

उदयपूर- किलाड मार्गावरील कडू नाला परिसरात धावत्या टाटा सुमोवर अचानक डोंगरांचा मोठा भाग कोसळल्याने हा भीषण अपघात घडला. वाहनातील दोन प्रवासी प्रसंगावधान राखून बाहेर उडी मारल्यामुळे बचावले, मात्र ते गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा सुमो वाहन कुल्लूहून चंबा जिल्ह्यातील पांगी खोऱ्याकडे जात होते. कडू नाला परिसरात पोहोचताच मुसळधार पावसामुळे कमकुवत झालेल्या डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळला. खडक आणि मातीचा ढिगारा डायरेक्ट वाहनावर पडल्याने गाडीचा चक्काचूर झाली आहे.

वाहनात एकूण १५ जण प्रवास करत होते. यापैकी दोन प्रवाशांनी वेळीच वाहनातून उडी मारून जीव वाचवला, तर उर्वरित १३ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अवघ्या सहा महिन्यांच्या बालकाचाही समावेश आहे.

हेही वाचा: विठ्ठल दर्शनानंतर फडणवीसांची मोठी घोषणा; पंढरपूरकरांसाठी पुढील २.५ वर्षांत….

बचावकार्यासमोर मोठे आव्हान

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, सीमा रस्ते संघटना (BRO), आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सतत दगड कोसळत असल्याने आणि परिसर दुर्गम असल्याने बचावकार्य अत्यंत कठीण झाले.

महाकाय खडक हटवण्यासाठी क्रेन आणि विशेष यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी केलांग येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

पावसामुळे वाढला दरडी कोसळण्याचा धोका

गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात (Himachal Landslide) मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडत असून रस्ते वाहतुकीसाठी वारंवार बंद करावे लागत आहेत. उदयपूर-किलाड मार्गही यापूर्वी दरडीमुळे बंद होता. रस्ता खुला झाल्यानंतर काही तासांतच हा भीषण अपघात घडल्याने प्रशासनालाही मोठा धक्का बसला आहे.

मृतांमध्ये चालकाचाही समावेश

या दुर्घटनेत वाहन चालकाचाही मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये पुरुष, महिला आणि एका सहा महिन्यांच्या बालकाचा समावेश असून काही मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. बहुतांश प्रवासी चंबा जिल्ह्यातील पांगी खोऱ्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

हिमाचल प्रदेशचे (Himachal Landslide) मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनीही घटनेची दखल घेत प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रशासनाचा नागरिकांना इशारा

हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी सध्या यलो अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी पर्वतीय मार्गांवरून प्रवास न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts