जळगाव–धुळे–नंदुरबार : खान्देशात रोजगार कमी का?
Khandesh Jobs : खान्देश… तरुणांची मोठी ताकद असलेला प्रदेश….! शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या वाढतेय, आणि पदवीपासून ITI, डिप्लोमा, इंजिनीअरिंगपर्यंत कौशल्यसंपन्न तरुणांची नवी पिढी तयार होतेय.पण तरीही एक प्रश्न कायम आहे…नोकरीसाठी खान्देशातील तरुण पुणे, मुंबई, नाशिक, सुरत किंवा अगदी राज्याबाहेर का जातात?जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये उद्योगांची क्षमता नाही का? MIDC आहेत…जमीन आहे…मनुष्यबळ आहे…कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे…मग रोजगाराच्या पुरेशा संधी का निर्माण होत नाहीत? खान्देशात रोजगाराचा प्रश्न नेमका कुठे अडकतोय?
आणि पुढच्या काळात स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी काय बदलण्याची गरज आहे? समस्या नेमकी कुठे आहे?
खान्देश म्हटलं की डोळ्यासमोर येते ती शेती…जळगावचा केळी पट्टा, कापूस, डाळी, कांदा आणि इतर कृषी उत्पादनं…
धुळे आणि नंदुरबारमध्येही शेती आणि त्यावर आधारित अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर आहे.पण इथेच रोजगाराच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर दडलं आहे.खान्देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे; मात्र शेतीमधून निर्माण होणाऱ्या प्रत्येक उत्पादनामागे मोठ्या प्रमाणावर स्थानिक प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, लॉजिस्टिक्स, ब्रँडिंग आणि मूल्यवर्धनाची साखळी तयार झालेली दिसत नाही.म्हणजे शेतात उत्पादन होतं…पण त्या उत्पादनावर आधारित मोठा उद्योग, मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया आणि त्यातून कायमस्वरूपी रोजगार निर्माण होण्याची साखळी तितकी मजबूत नाही.यामुळे तरुणांसमोर दोनच पर्याय उरतात…शेतीत राहायचं किंवा बाहेर जाऊन नोकरी शोधायची…..
हेही वाचा : अभिजीत दिपकेंचं मोदींना थेट चॅलेंज; आधी डिग्री दाखवा, मीही कागदपत्रं दाखवतो!
MIDC असूनही रोजगाराच्या संधी कमी का? ( Khandesh Jobs Unemployment )
आता दुसरा मोठा प्रश्न…
खान्देशात MIDC नाहीत का?धुळ्यातील MIDC क्षेत्रासाठी 400.35 हेक्टर क्षेत्र नियोजित करण्यात आलं आहे, त्यापैकी 278.08 हेक्टर जमीन MIDCच्या ताब्यात आली असून रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. MIDCच्या अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रांची मोठी यंत्रणा उभी करण्यात आली आहे आणि उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्रमुख काम आहे. म्हणजे समस्या फक्त “MIDC नाही” अशी नाही. मुद्दा आहे…MIDCमध्ये किती उद्योग येतात? किती उद्योग प्रत्यक्ष उत्पादन सुरू करतात? किती रोजगार निर्माण होतात? आणि त्या रोजगारात स्थानिक तरुणांचा किती वाटा असतो?
हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.
Khandesh Unemployment : तरुण सुरतकडे का जातात? आता सर्वात जास्त जाणवणारा परिणाम…स्थलांतर. जळगाव ( Jalgaon ) , धुळे आणि नंदुरबारमधील अनेक तरुण रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे किंवा औद्योगिक केंद्रांकडे जातात. काही पुण्यात…काही मुंबईत…काही नाशिकमध्ये…तर खान्देशाच्या भौगोलिक जवळीकतेमुळे अनेकजण सुरतकडेही जातात. कारण तिथे त्यांना फक्त एक नोकरी मिळत नाही…
तर एक पूर्ण रोजगार ecosystem मिळतो. एका मोठ्या उद्योगाभोवती छोट्या कंपन्या असतात…त्यांच्या आसपास सेवा व्यवसाय असतात…वाहतूक असते…गोदामं असतात…हॉटेल्स असतात…दुकानं असतात…आणि हजारो अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. यालाच औद्योगिक रोजगाराची साखळी म्हणता येईल. खान्देशासमोरचा खरा प्रश्न हीच साखळी निर्माण करण्याचा आहे.
खान्देशकडे उद्योगांसाठी जमीन आहे, तरुणांचं मनुष्यबळ आहे आणि कृषी उत्पादनाची मोठी ताकद आहे…गरज आहे ती या ताकदीला उद्योग आणि रोजगाराच्या साखळीत जोडण्याची! स्थानिक उद्योग वाढले, तर तरुणांचं स्थलांतरही कमी होऊ शकतं…
कारण खान्देशातील तरुणांना रोजगारासाठी बाहेर जाण्याची नाही, तर खान्देशातच संधी निर्माण होण्याची गरज आहे!





