Rupali Chakankar: पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या कथित बदनामीप्रकरणाने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील आणि बदनामीकारक पोस्ट केल्याच्या तक्रारीनंतर सुषमा अंधारे, रुपाली पाटील ठोंबरे, अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशोक खरात प्रकरणाशी जोडली जात आहे. खरातला मार्च 2026 मध्ये गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याच्यासोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. चाकणकर यांच्या तक्रारीनुसार, या जुन्या फोटो-व्हिडिओंचा आधार घेत त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला.
हेही वाचा: पालकांचा खर्च होणार कमी! 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर; सरकारचा मोठा निर्णय
चाकणकर यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत 20 मार्च रोजी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबसह विविध सोशल मीडिया अकाउंट्सवर अश्लील, धमकीवजा आणि बदनामीकारक पोस्ट आढळल्याचा दावा केला आहे. संबंधित पोस्टचे स्क्रीनशॉट आणि अकाउंट्सची माहिती पोलिसांकडे सादर केल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये विविध राजकीय पक्षांशी संबंधित महिला नेते, सोशल मीडिया पदाधिकारी आणि इतर व्यक्तींचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून, कोणतीही अश्लील पोस्ट केल्याचे त्यांनी नाकारले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून नेमकं काय समोर येतं आणि पुढील कायदेशीर कारवाई कोणत्या दिशेने जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.









